बारामती : जगभरात कोरोेना पसरल्यामुळे सर्वच उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे.सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नसल्याचे चित्र आहे. मात्र, बारामतीच्या शेतकऱ्यांनी मंदीत संधी साधली आहे.कोरोनामुळे येथील स्थानिक बाजारपेठ अडचणीत आली. अनेक शेतकऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका असून देखील घरोघरी जाऊन कलिंगड, खरबूज, चिकू सारख्या फळांसह भाजीपाला विकावा लागला. मात्र, मागणी अभावी कवडीमोल दरात ही शेती उत्पादने विकावी लागल्याचे वास्तव आहे. त्यातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बारामती येथील बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अपवाद ठरली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात सर्वत्र निर्यात बंद आहे. मागणी असल्याने निर्यात बंद करण्याची वेळ आली. मात्र, केवळ दर्जेदार आणि विषमुक्त उत्पादनामुळे या शेतकऱ्यांच्या कंपनीने संकटाच्या काळात संधी साधण्यास यश मिळविले आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा दुप्पटीने या शेतकऱ्यांना युरोपमध्ये दर मिळाला आहे. तालुक्यातील मळद आणि निरावागज येथील शेतकऱ्यांनी करार पद्धतीने २० एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे.मात्र, लॉकडाऊनमुळे या भेंडीची निर्यात अडचणीची ठरली होती. आतापर्यंत दीडटन भेंडीची निर्यात करण्यास यश आल्याचे बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले.