पुणे : एकीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना दुसरीकडे शासन मराठी शाळा कशा बंद पडतील, अशा प्रकारचे धोरण आखत आहे. मराठी भाषेचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे भविष्य काय असेल, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी उपस्थित केला. मराठीत आजकाल खूप निरुपयोगी साहित्य लिहिले जाते. समीक्षा हा गंभीर स्वरूपाचा बौद्धिक व्यवहार असून, मोजके लोक त्याकडे गांभीर्याने पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे हरिश्चंद्र थोरात यांच्या ‘मूल्यभानाची सामग्री’ या ग्रंथाला प्रा. रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी शब्द प्रकाशनाचे येशू पाटील यांनाही गौरविण्यात आले. कोत्तापल्ले यांच्या हस्ते बुधवारी माधवराव पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘मराठी साहित्य आणि समीक्षेला समृद्ध परंपरा लाभली आहे. त्याकडे शोधदृष्टीने पाहणारे मोजके लोक आहेत. साहित्यनिर्मिती आणि मूल्यमापनामध्ये विविध विद्याशाखा, ज्ञानशाखांचा समावेश होतो. मूल्यांना महत्त्व दिल्यास साहित्य श्रेष्ठ ठरते. आजकाल अनेक लेखकांना देशीवादाचे गारुड आवडू लागले आहे. लेखक भूमिका मांडतो, लिहितो, त्या वेळी राजकारणच करीत असतो. या राजकारणामुळे संतांना त्रास होतो आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या बुद्धिवादी माणसाची हत्याही होते.’’बण्डा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)मानवी जाणीव ही जाणकारांना पारदर्शकतेने कळू शकते. साहित्यातील रहस्यमयता अभेद्य नसते. त्यासाठी साहित्य क्षेत्राच्या विशुद्धतेचा त्याग करणे गरजेचे असते. साहित्यिक ही प्रतिभेची ईश्वरी देणगी मिळालेली अनन्यसाधारण व्यक्ती आहे. लेखकाने समाज, संस्कृती, सत्ता या संकल्पना समीक्षा व्यवहारात आयात करणे आवश्यक असते. असे केल्यास साहित्य क्षेत्राच्या वर्तुळात प्रवेश करणे शक्य होते. लेखकाचा स्वत:शी होणारा संवाद खराखुरा वाचक वाचतो. असा सुजाण वाचक मिळण्याच्या शक्यता धूसर होत आहेत. लेखकाने वाचकांच्या सांस्कृतिक अस्मितांना कुरवाळणे गरजेचे असते. उथळ सांस्कृतिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन लिहिणे, हे लेखकाचे कर्तव्य आहे.- हरिश्चंद्र थोरात
मराठी भाषेचे भविष्य काय ?
By admin | Updated: February 23, 2017 03:27 IST