पुणे: जिल्ह्यातील सुमारे ५२० पर्यटकांनी जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती दिली आहे. हे सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या माघारीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. याची माहिती राज्य सरकारसह जम्मू काश्मीर सरकार केंद्र सरकारकडे देण्यात आली आहे. या पर्यटकांसाठी विशेष रेल्वे तसेच विमानाची सोय करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. अडकलेल्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शहरातील दोघांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरापर्यंत विमानाने आणण्यात आले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहरातील दोघांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती कळताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले तसेच या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांबाबत माहिती घेण्याचे निर्देश दिले. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सोशल मीडियावरून काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांविषयी माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले. त्यानंतर रात्री १० वाजेपासून अडकलेले पर्यटक, त्यांच्या नातेवाईकांनी फोन करण्यास सुरुवात केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी ९ पर्यंत ८४, अकरापर्यंत १५० तर दुपारी १ पर्यंत २५० तर तीनवाजेपर्यंत ४५० पर्यटकांची यादी तयार झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत ही यादी ५२० इतकी झाली. ही सर्व यादी राज्य सरकारच्या मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देण्यात आल्याचे बनोटे यांनी सांगितले.
याबाबत बनोटे म्हणाले, “संपर्क केलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यातील काही पर्यटक परतीच्या प्रवासालाही निघाले आहेत. तर काही जणांचे माघारीचे नियोजन पुढील काही दिवसांतील असले तरी त्यांना तातडीने माघारी पुण्यात यायचे असल्याचे सांगितले. या घटनेनंतर अनेकांच्या बोलण्यात चिंतेचा आणि काळजीचा सूर आहे. त्यासाठी राज्य सरकार नियोजन करणार आहे. सध्या मृतदेह आणण्याचे नियोजन अंतिम करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पुण्यात आणण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकते.”
पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य सरकार, जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत. अडकलेल्या पर्यटकांची यादी सर्वांना सामाईक केली आहे. हे सर्व पर्यटक लवकरात लवकर परत यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रेल्वे आणि विमानाचे नियोजन सुरू आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
काहीही करून आम्हाला घरी यायचे आहे, अडकलेल्या पर्यटकांचे जिल्हा प्रशासनाला आर्जव
पहलगाममधील कालच्या घटनेमुळे आम्ही खूप घाबरलो आहोत. येथून आम्हाला काहीही करून पुण्यात परत यायचे आहे. प्रशासनाने आम्हाला परत आणायची काय व्यवस्था केली आहे. आम्हाला येथून बाहेर कधी काढणार आहात, असे प्रश्न नियंत्रण कक्षातील फोनवरून अडकलेले पर्यटक विचारत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन सतत खणखणत आहेत. फोन केल्यावर तरी आपल्याला तातडीने मदत मिळेल, अशी आशा या पर्यटकांना लागून राहिली आहे. पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झाले आहेत. तिथे अडकलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला असून तो २४ तास सुरू आहे. साधारण रात्री १० नंतर नियंत्रण कक्षाला फोन सुरू झाले आणि सर्वांना चिंता वाटत असून पुण्याला परत येण्याची एकच मागणी केली जात आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५२० पर्यटकांनी फोन करुन विचारणा केली. आपत्ती विभागाच्या वतीने पर्यटकांना तुम्ही कुठे आहात, किती जण आहात यांची सर्व माहिती घेतली जात आहे. तसेच तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुरक्षित असल्याचे सांगत धीर देण्याचे काम केले जात आहे.