पुणे : जिल्ह्यात १८ टँकरने १४ गावे व ८० वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी एकट्या बारामतीत ८ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला २४ टँकरने पाणीपुरवठा होत होता. या वर्षी जिल्ह्यात टँकरचे प्रमाण कमी दिसत असले, तरी टंचाईची तीव्रता जास्त आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तालुक्यातून आले आहेत. मात्र, तेथे टँकरच सुरू झाले नाहीत. गेल्या वर्षी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. त्यामुळे तालुकापातळीवर मागणीनुसार त्वरित टँकर सुरू होत असे. आता तहसीलदारांचे अधिकार काढून ते पुन्हा जिल्हाधिकारी यांना दिल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून तहसीलदाराकडे व त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर मंजुरी दिली जात. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने टँकर लवकर मिळत नाहीत. त्यामुळे टंचाई असूनही टँकर न मिळल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जिल्ह्यात १८ टँकरने १४ गावे, ८० वाड्यांवर सुमारे २४ हजार ५९२ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात बारामतीत ८ टँकरने ४ गावे, ४१ वाड्यावस्त्यांवर १४ हजार ९५ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जास्त असून, ५ टँकरने २ गावे २७ वाड्यांना पाणी दिले जात आहे. आंबेगाव तालुक्यात दोन टँकर सुरू असून, ४ गावे, ६ वाड्यावस्त्यांवर ३ हजार ६९० लोकसंख्येला टँकरने पाणी सुरू आहे. भोर तालुक्यात ३ गावे व २ वाड्यांना २ टँकर सुरू आहेत. दौंड तालुक्यात १ टँकरने १ गाव, ४ वाड्यांना पाणी पुरवले जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी ८ विहिरी अधिगृहित केल्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १८ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: May 12, 2015 04:09 IST