खोडद : मागील काही वर्षांपेक्षा यावर्षी निर्यातक्षम जंबो व्हरायटीच्या द्राक्षांना चांगला बाजारभाव मिळेल, असा अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास होता; मात्र चालू वर्षी जंबो व्हरायटीला १०५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसत आहे. त्यात भर म्हणजे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर वटवाघुळांच्या झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या असून वटवाघुळांच्या या झुंडी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त करत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.मागील २० ते २५ वर्षांनंतर यावर्षी निर्यातक्षम जंबो व्हरायटीच्या द्राक्षांना चांगला बाजारभाव राहील असा, अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास होता. यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील संपूर्ण वर्षाचे आर्थिक मनसुबे मनात आखले होते. पहिल्या वेळेला सुमारे १५० ते १४० रुपये निर्यातक्षम जंबो व्हरायटीच्या द्राक्षांना प्रतिकिलो बाजारभाव मिळाला, मात्र नंतर हेच बाजारभाव खाली येऊन १०५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने उत्पादन खर्चाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यांचे पुढील आर्थिक वर्षाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे चित्र सध्या जुन्नर तालुक्यात पहावयास मिळत आहे.वटवाघुळांच्या झुंडी रात्रीच्या वेळी द्राक्ष बागांमध्ये येतात, विशेष म्हणजे द्राक्ष बागांमधील मोठ्या मण्यांचे द्राक्षांचे घडही वटवाघुळांकडून फस्त केली जात आहेत. काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वटवाघुळांपासून द्राक्षांचे संरक्षण व्हावे, म्हणून द्राक्ष बागांना चारही बाजूंनी व वरच्या बाजूने जाळी लावली आहे.द्राक्ष बागांना जाळी लावूनदेखील वटवाघुळांपासून द्राक्षांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. इतर पक्षांच्या तुलनेत वटवाघुळांकडून द्राक्षांचे मोठे नुकसान होत आहे. वटवाघुळांच्या झुंडी दोन दिवसांत सुमारे १ टन द्राक्ष फस्त करत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष खोकराळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
वटवाघुळांचा नाईट अॅटॅक; द्राक्ष बागायतदार त्रस्त
By admin | Updated: February 5, 2017 03:18 IST