पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुने वाडे पडून दुर्घटना घडू नये याकरिता महापालिकेने धोकादायक ९९१ वाड्यांना नोटिसा बजावल्या आहेत, तर अतिधोकादायक परिस्थितीमध्ये आढळून आलेले ३३ वाडे तातडीने पाडण्यात येणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वीच पुणे शहरामध्ये नुकताच १०२ मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस झाला. मॉन्सून सुरू झाल्यानंतर पावसामुळे जुने वाडे पडून अनेक दुर्घटना घडतात. महापालिकेने शहरातील धोकादायक वाड्यांची पाहणी करून ९९१ वाडे हे धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे निश्चित केले आहे. त्यातील ३३ वाडे अतिधोकादायक बनले आहेत. या सर्व वाड्यांच्या मालकांना तसेच तिथे राहात असलेल्या भाडेकरूंना यापूर्वीच नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. वाडे कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अतिधोकादायक असलेले वाडे पोलीस संरक्षणामध्ये पाडण्यात येणार आहेत. गेल्या दीड महिन्यामध्ये ४५ धोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. वाड्याचा धोकादायक भाग पाडण्याच्या सूचना दिल्या जातात. तसेच जर दुरुस्ती होणे शक्य असेल तर त्या बाबतच्या सूचना वाडेमालकांना दिल्या जात आहेत. वाडा धोकादायक स्थितीमध्ये असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. त्यात तथ्यता आढळून आली तर नोटिसा बजावल्या जातात. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही सुमोटो पाहणी करून धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.
अतिधोकादायक ३३ वाडे पाडणार
By admin | Updated: May 16, 2015 04:33 IST