दौंड : कारवाई केली की पुन्हा काही दिवसांत तेथे पुन्हा वाळूउपसा सुरू होत असल्याचे दौंड तालुक्यात चित्र आहे. बुधवारी महसूल विभागाने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करीत १४ बोटी आणि १० जेसीबी ताब्यात घेतल्या. सुमारे १0 तास ही कारवाई सुरू असल्याने तस्करांची एकच पळापळ झाली. १ एप्रिल ते आजअखेर बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या ४०७ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई करून २ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, वाळू तस्करांनी या कारवाईला भीत नसल्याचे वारंवार दाखवून दिले आहे. कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी उपसा सुरू केला जातो. भीमा नदीचे पात्र पोखरण्याचा जणू विढाच उचलला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात मोठ्या प्रमाणात हा उपसा सुरू असतो. याची माहिती महसूल खात्याला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी सकाळपासून कारवाई सुरू केली. सकाळी ८ वाजता महसूल खात्याचे भरारी पथक खानवटे, नायगाव, मलठण या भागात दाखल झाले. तेव्हा बेकायदेशीर वाळूमाफियांची एकच पळापळ झाली. या वेळी पथक पाण्यात उतरले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर हिंगणीबेर्डी, शिरापूर या परिसरातून १४ बोटी ताब्यात घेतल्या. त्यानंतर हिंगणीबेर्डी, पेडगाव, वडगाव दरेकर, कडेठाण, कासुर्डी, खुटबा या परिसरातून १० जेसेबी ताब्यात घेतले. तहसीलदार उत्तम दिघे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईत नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके, संजय स्वामी, सुनील जाधव, अभिमन्यू जाधव, संतोष इडळे, सतीश मोकाशी, जयंवत भोसले, गुलाम हुसेन, बी. एम. गायकवाड, दादा कांबळे, पांढरपट्टे, यादव आदी सहभागी झाली होते. (प्रतिनिधी)१ एप्रिल ते आजअखेर बेकायदेशीर वाळूवाहतूक करणाऱ्या ४०७ वाहनांवर कारवाई करून २ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तेव्हा भविष्यात शासनाचा महसूल वाढविण्यासाठी बेकायदेशीर वाळूउपशावर कारवाई करून दंडात्मक वसुली केली जाईलच; परंतु कायदेशीर कारवाई करून वाळूमाफियांना लगाम लावल्याशिवाय राहणार नाही.- उत्तम दिघेतहसीलदार
दौंडमध्ये वाळूतस्करांची पळापळ
By admin | Updated: December 17, 2015 02:11 IST