पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये गुईलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्या भागात रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे; परंतु समाविष्ट गावांतील आरोग्य सुविधा केंद्रे अद्यापही महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. या वेळखाऊ प्रक्रियेचा फटका समाविष्ट गावांतील नागरिकांना बसत आहे.महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये मिळकत कर, शाळा इमारती, आरोग्य केंद्रे अशा अनेक गोष्टींचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र आरोग्य केंद्रांसारख्या महत्त्वाच्या सेवा अद्याप हस्तांतरित केल्या नाहीत. किरकटवाडी भागातील आरोग्य केंद्रांमध्ये अद्यापही जिल्हा प्रशासनाचा अंकुश आहे. पुणे जिल्ह्यातून नोंदवलेले बहुतांश रुग्ण हे डीएसके विश्व, नांदेड गावाच्या आत आणि बाहेर, धायरी, नऱ्हे, किरकटवाडी आणि परिसरातील आहेत.तर काही क्षेत्र २०१७ पासून महापालिकेमध्ये विलीन केले गेले आहेत. आरोग्य यंत्रणा अजूनही पुणे जिल्हा प्रशासनाद्वारे व्यवस्थापित केली जाते. त्यामुळे तेथे जिल्हा आरोग्य केंद्राचे कर्मचारी काम करतात. ‘जीबीएस’ उपाययोजनेत त्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पथक नेमून, सर्वेक्षण करणे याची जबाबदारी त्यांनी पार पाडणे अपेक्षित आहे. असे असताना महापालिकेला त्यांचे मनुष्यबळ उभारून तेथे कार्यवाही करावी लागत आहे.
गावे समाविष्ट झाली; पण आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेकडेच
By राजू हिंगे | Updated: January 24, 2025 19:47 IST