पुणे : हडपसर हांडेवाडी रोडवरील सातवनगर येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे सफाई कर्मचारी साफसफाई करायला गेला. त्यावेळी त्याला मशीनमध्ये कार्ड टाकायच्या जागी काही तरी विचित्र लावले असल्याचे लक्षात आले. त्याने ही बाब वरिष्ठांना कळविली. त्यातून कार्ड क्लोनिंगचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करुन एका आफ्रिकन नागरिकाला पकडले असून त्याच्याकडून या सेंटरमध्ये लावलेले डिव्हाईस, बॅटरी, बॅग, पासपोर्ट जप्त केला आहे. सफाई कर्मचार्याच्या दक्षेतेमुळे शेकडो लोकांच्या खात्यावर डल्ला मारण्याचा सायबर चोरट्यांचा प्रयत्न फसला.
याप्रकरणी रामचंद्र मल्लीकार्जुन जाधव (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जाधव हे युरोनेट या कंपनीत सहायक व्यवस्थापक आहे. त्यांच्या कंपनीकडे एटीएम सेंटरच्या देखभालीची काम देण्यात आले आहे. सातवनगर येथील आयसीआयसी बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये जेथे ग्राहक कार्ड आत घालतात. तेथे या सायबर चोरट्याने चिकट स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावले होते. तसेच पासवर्ड टाईप करतो तेथे पिनहोल कॅमेरा लावला होता. त्यादवारे तो एटीएममध्ये येणार्या ग्राहकांचे कार्डवरील गोपनीय डाटा व पासवर्ड डिव्हाईसद्वारे चोरी करीत होता. ही बाब समजल्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला, त्यात एक आफ्रिकन नागरिक हे करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
३ वेळा बसविला होता डिव्हाईस
या आफ्रिकन नागरिकाने या एटीएम सेंटरमधील मशीनवर ३ वेळा हा डिव्हाईस बसविला होता. त्याद्वारे त्याने अनेकांचा पासवर्ड त्यामध्ये घेतला होता. या डिव्हाईसची बॅटरी साधारण ३ तास चालते. त्यामुळे त्याने किमान ९ तासामध्ये या एटीएम सेंटरमध्ये आलेल्या ग्राहकांच्या कार्डचा डाटा चोरला होता.