पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळ अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्याचे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. प्रशासकीय मंडळाचे सदस्य म्हणून संजय भेंडे आणि अविनाश महागावकर काम पाहतील. देशातील सर्वांत मोठी राज्य बँक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ओळखले जाते. आर्थिक गैरशिस्तीच्या कारणावरून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या शिफारसीनुसार सहकार विभागाने ७ मे २०११ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर डॉ. एल. एल. सुखदेवे यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांचे प्रशासकीय मंडळ बँकेवर नेमण्यात आले. त्यात अनास्कर, भेंडे, महागांवकर यांच्यासह अशोक मगदुम आणि कुमार तांबे यांचाही समावेश होता. सुखदेवे यांनी १९ एप्रिल २०१८ रोजी पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यापुर्वी १ आणि २ डिसेंबर २०१७ रोजी मगदुम आणि तांबे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन प्रशासकीय मंडळाकडे कामाची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेची उलाढाल २७ हजार ८७० कोटी रुपये असून, खेळते भांडवल ३० हजार कोटी रुपये आहे. गतवर्षी बँकेस २४५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यातून सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटपही करण्यात आले. या बँकेस १०७ वर्षे पूर्ण झाली असून, राज्यातील सहकारी पत पुरवठ्याची शिखर संस्था म्हणून ती काम करते. बँकेच्या अंतर्गत राज्यात ३१ जिल्हा बँका, २१ हजार प्राथमिक कृषी संस्था, ५०७ नागरी सहकारी बँका, २४ हजार पतसंस्था आणि २५ हजार नोकरदारांच्या पतसंस्था कार्यरत आहेत. ---------------साखरेचे भाव कोसळल्यामुळे कारखान्यांच्या कर्जासाठी अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर अनुत्पादक खात्यांची तरतूद करण्याची जबाबदारी बँकेच्या प्रशासकीय मंडळावर आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रशासकीय मंडळ प्रयत्न करेल. - विद्याधर अनास्कर
राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनास्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:32 IST
आर्थिक गैरशिस्तीच्या कारणावरून रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या शिफारसीनुसार सहकार विभागाने ७ मे २०११ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.
राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकपदी विद्याधर अनास्कर
ठळक मुद्देबँकेच्या अंतर्गत राज्यात ३१ जिल्हा बँका, २१ हजार प्राथमिक कृषी संस्था, ५०७ नागरी सहकारी बँका, २४ हजार पतसंस्था राज्य सहकारी बँकेची उलाढाल २७ हजार ८७० कोटी रुपयेसाखरेचे भाव कोसळल्यामुळे कारखान्यांच्या कर्जासाठी अपुरा दुरावा निर्माण