पुणे : मोठ्या व्यावसायिक वाहनांचे दर वर्षी घ्यावे लागणारे फिटनेस सर्टिफिकेट (वाहन सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र ) आता देशातील कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळणार आहे. या बाबतची अधिसूचना केंद्रीय रस्ते आणि परिवहन विभागाने नुकतीच काढली असल्याची माहिती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य बाबा शिंदे यांनी दिली. या पूर्वी मोटार वाहन अधिनियमात असलेल्या तरतुदीनुसार, ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी केली आहे व ज्या ठिकाणचे पासिंग आहे, त्याच ठिकाणी हे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. देशभरात ट्रक, टे्रलर, बस, टँकर अशी मालवाहतूक करणारी वाहने मालवाहतुकीसाठी फिरत असतात. त्यामुळे अनेकदा या वाहनांची योग्यता प्रमाणपत्राची मुदत या वाहतुकीच्या कालावधीत संपलेली असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कागदपत्रांच्या तपासणीसाठी वाहन थांबविले जाते, त्या ठिकाणी योग्यता प्रमाणपत्र नसल्याने वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाची आकरणी केली जाते; तसेच हे प्रमाणपत्र नसल्यास एखादा अपघात झाल्यास, त्याचा विमाही मिळत नव्हता. त्यामुळे या वाहनांच्या कागदपत्रांसाठी एकच कायदा असल्याने, या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देशभरात कोठेही दिले जावे, अशी मागणी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केलेली होती. त्यानुसार, देशात व्यावसायिक वाहनांना कोठेही हे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र देशात कुठेही मिळणार
By admin | Updated: November 7, 2015 03:41 IST