पिसोळीकरांना हवाय एसटीपी, क्रीडांगणासाठी जागा
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पिसोळीतले वाढते शहरीकरण पाहता आता लोकसंख्येनुसार मुबलक पायाभूत सुविधांची आवश्यकता गावाला आहे. क्रीडांगण, मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प (एसटीपी) आदी सुविधा विलिनीकरणानंतर मिळाव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
गावात कचरा व्यवस्थापन यंत्रणा नाही. ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या कचरा उचलतात, तरीही गावात चोहीकडे कचरा साचलेला असतो. कचरा जाळला जात असल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने यात लक्ष घालावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय असून ती जीवघेणी ठरणारी आहे. त्यातून निघणाऱ्या धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक अपघात घडतात. प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. भूमिगत गटारांची कामे झाली पण सगळे सांडपाणी उघड्या जागेवर सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी ड्रेनेज फुटले असून सांडपाणी रस्त्यावर वाहून जात आहे. त्यामुळे विकासही नाही आणि अनारोग्य अशा दुहेरी कात्रीत गावकरी सापडले आहेत.
मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. महापालिका आल्यानंतर ती काढली जातील अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. गावात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान नाही, खेळण्यासाठी मैदान नाही. या सुविधा महापालिकेने द्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.
कोट
“गावाची लोकसंख्येनुसार गावाला मुबलक पाणीपुरवठा महापालिकेकडून व्हावा. गावातील वाढती लोकसंख्या पाहता रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे. तोपर्यंत कर आकारणी करू नये.”
- दीक्षा निंबाळकर, सरपंच
कोट
“पिसोळीत २० वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. शेजारी गावातून पाणी विकत आणावे लागते. महापालिकेने पाण्यासोबतच इतर पायाभूत सुविधांचा विकास करावा.”
-तानाजी काळभोर, माजी सरपंच
फोटो ओळी
ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या जागेचा वापर खासगी इमारतीच्या बांधकामासाठी होत असून येथील राडारोड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.