पुणे-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात असताना मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अनुपस्थित राहिल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण वसंत मोरे अखेर वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी पोहोचले असून राज ठाकरेंसोबतच ते असणार आहेत. त्यामुळे वसंत मोरेंनी पक्ष सोडल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक होऊन औरंगाबादला रवाना होणार आहेत. वसंत मोरे यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते काल नव्हते. पण ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला आवर्जुन उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी 'लोकमत'ला दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी आज ते त्यांच्या पुण्यातील राहत्या घरून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मनसेचे पुणे आणि मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी जातीने हजर होते. परंतु या सर्वांमध्ये एका व्यक्तीची मात्र कमी जाणवत होती. ती म्हणजे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे. राज ठाकरे यांचं जेव्हा शुक्रवारी पुण्यात आगमन झालं तेव्हा पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. परंतु वसंत मोरे मात्र गैरहजर होते. यावर मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी स्पष्टीकरण देत सर्व वसंत मोरेंनी पक्ष सोडल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच स्वत: वसंत मोरे देखील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर पोहोचले असून त्यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे यासंदर्भात जी भूमिका घेतली होती त्यानंतर वसंत मोरे काहीसे नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना माझ्या प्रभागात मशिदीसमोर भोंगे लावणार नाही असं देखील जाहीर केलं होतं. तेव्हा वसंत मोरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती. वसंत मोरे यांच्या या भूमिकेनंतर अनेक मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर काही मनसैनिकांनी राजीनामे देखील दिले होते. पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती.