वाल्हे : पुरंदरकरांसाठी संजीवनी असलेली गुंजवणी बंद पाइपलाइन योजना आता शेवटच्या टप्प्यात आहे. या योजनेबाबत उलटसुलट चर्चा व राजकीय हस्तक्षेप यामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या योजनेचे लाभार्थी असलेल्या वाल्हे ग्रामस्थांसोबत गुंजवणी प्रकल्पाचे अधिकारी व एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करीत लोकांना योजनेची अधिकृत माहिती दिली असता या योजनेबद्दल शेतकरी वर्गाने अनेक प्रश्नांचा भडिमार करीत हरकतच घेतली.
गुंजवणी धरणाचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे वाल्हे गावाला मिळणार आहे. मात्र, त्याचे सर्वेक्षणाचे काम शेतकरी वर्गाला माहीत न होताच केल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. जमलेल्या सर्व शेतकरी वर्गाने त्रुटी मांडल्या.
मांडलेले मुद्दे
गुंजवणी धरणाच्या पूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार पाइपलाइन गेल्यास वाल्हेच्या पूर्वेकडील परिसर भिजू शकतो. पिंगोरी, दौंडज, आडाचीवाडी, वागदर वाडी, मार्गे राख या शेवटच्या ठिकाणी पाणी जाऊ शकते, म्हणजे पाणी टॉप टू बॉटमने पाणी सोडावे. योजनेला प्लान दोन असावा, तो म्हणजे हे पाणी पिंगोरी व दौंडज खिंड येथील ओढ्यामध्ये सोडता यावे, जेणे करून या ओढ्यावरील सर्व बंधारे भरून घेत हे पाणी सायपिंग ने टॉप टू बॉटमला जाईल. वाल्हे येथील किती जमीन ओलिताखाली येणार याची माहिती शेतकरी वर्गाला मिळावी. ज्या जमिनीतून पाइपलाइन जाणार आहे त्यांना मोबदला मिळणार का, असा सवाल करीत निवेदनाची प्रत अधिकारी वर्गाला दिली.
याबाबत जलसंपदा अधिकारी सोनवणे ए. बी. व सहकारी सागर खटावकर म्हणाले की तुमच्या सर्व मागण्या अधिकारी वर्गापर्यंत पोहोचवून पुन्हा आपण एकत्र बसू.
चर्चेमध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, शेतकरी फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, त्रिंबक माळवतकर, रणसिंग पवार, माजी सरपंच दत्ताअण्णा पवार, महादेव चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, भाऊसाहेब भोसले, राहुल यादव, सूर्यकांत भुजबळ, समदास राऊत, डी. एन. पवार, मदन भुजबळ, धनंजय पवार, तुषार भुजबळ, दादा म्हेत्रे, अनिल भुजबळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटोओळ : वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये गुंजवणी धरणाच्या बंद पाइपलाइनने येणाऱ्या पाण्याबद्दल शंकांचा भडिमार करताना शेतकरी वर्ग.