पुणे : मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी घडलेल्या वैष्णवी हगवणे (वय 23) यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आज एक मोठी अपडेट समोर आली असून, फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वारगेट येथून पहाटे अटक केली. शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर दोघांनाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील आनंद उर्फ अनिल कसपटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे हे प्रकरण आत्महत्येऐवजी हत्येचे असल्याचा संशय बळावला आहे. यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक झाली असून, त्यांना 26 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.फिर्यादीचे वकील शिवम निंबाळकर यांनी सांगितले की, पोलिसांना अजूनही या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. वैष्णवीला मारहाणीसाठी वापरलेले हत्यार शोधून जप्त करणे आणि या प्रकरणात इतर कोणी मदत केली आहे का, याचा तपास करणे बाकी आहे. तसेच, मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.