- सुकृत करंदीकर
(लेखक ‘लोकमत’चे सहसंपादक आहेत.)
----------------------
वर्ष होतं १९८२. बॅॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या गच्छंतीनंतर बॅॅॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चालून आलं. हे बॅॅरिस्टर तोलूनमापून बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. मनात येईल ते बोलून मोकळे होणारा हा नेता. मुख्यमंत्रिपद जसं अचानक आलं तसंच ते गेलंही. त्यांचं तोंडंच त्याला कारणीभूत ठरलं. या फटकळ बाबासाहेबांना थेट इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. ‘हायकमांडने लादलेले’ असल्यानं कॉंग्रेस आमदारांनी त्यांना मनापासून कधी स्वीकारलं नव्हतं. साहजिकच मंत्रालयातल्या मजल्यांवर आणि विधिमंडळातल्या दालनांमध्ये बाबासाहेबांच्या विरोधातली कुजबूज चालू असायची. कॉंग्रेस आमदार बाबासाहेबांच्या विरोधात बंड करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. साहजिकपणे पत्रकारांनी मुख्यमंत्री भोसले यांना विचारणा केली. त्यावर बॅॅरिस्टर बाबासाहेब उत्तरले, “आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची असते. त्यांनी माझं सरकार पाडून दाखवावंच.” हे आव्हान देऊन ते थांबले नाहीत. पत्रकारांसोबतच्या याच गप्पांमध्ये त्यांनी स्वपक्षीय कॉंग्रेस आमदारांना उल्लेखून ‘गिधाडे’, ‘खटमल’, ‘मच्छर’ अशा उपमाही सढळपणे दिल्या.
नशीब त्याकाळी आत्तासारखा ‘सोशल मीडिया’ नव्हता. तरीही बॅॅरिस्टरांचे शब्द कॉंग्रेस आमदारांपर्यंत पोहोचले आणि स्फोटच झाला. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसच्याच आमदारांचं केलेलं हे वर्णन सामान्य माणसासाठी खूप गंमतीचं ठरलं. आमदार मात्र संतापले. चिडलेल्या आमदार नानाभाऊ एंबडवार यांनी स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांविरोधात थेट हक्कभंग दाखल केला. हा अभूतपूर्व पेचप्रसंग होता. ‘हायकमांड’नं मध्यस्थी करत भोसलेंची पाठराखण केली. एवढं प्रक्षोभक बोलल्यानंतरही त्यांचं मुख्यमंत्रिपद शाबूत राहिलं. “निदान त्यांनी तरी मला शहाणपणा शिकवण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही,” असं शरदराव पवार यांना विधानसभेतच सुनावण्याइतका फटकळपणा बॅॅरिस्टर भोसले यांच्याकडे होता. त्यांच्या अशाच शब्दांचा डोंगर साचत गेला आणि त्यांची खुर्ची गेली. त्याहीवेळी हा माणूस म्हणाला, “माझं मुख्यमंत्रिपद काढून घेतलं. पण ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद आता कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?”
सभांमध्ये बोलताना श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे चेकाळून जाणाऱ्यांचं काय होतं हे अजित पवार, प्रशांत परिचारक यांच्या रूपानं महाराष्ट्रानं अलिकडच्या काही वर्षात पाहिलं. सार्वजनिक आयुष्यात शब्द, शब्द जपून तोलून वापरला पाहिजे हा संकेत झाला. पण या संकेतभंगाची उदाहरणे पूर्वापार चालत आली आहेत. यशवंतराव चव्हाण यांना ‘सुसंस्कृत नेते’ म्हणून ओळखलं जातं ते केवळ त्यांच्या ग्रंथसंग्रहामुळं किंवा साहित्यिकांशी असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीमुळं किंवा केवळ काही पुस्तकं लिहिली म्हणून नव्हे तर सार्वजनिक जीवनात आयुष्यभर त्यांनी भान राखलं म्हणून. त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे पुष्कळ आहेत, पण यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा अंगभूत सुसंस्कृतपणा किती जणांकडं असतो आणि सुसंस्कृतपणाचा वर्ख किती जणांवर असतो, हा कळीचा प्रश्न आहे. अगदी त्यांचे मानसपुत्र म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवार यांनीही त्राग्यातून का होईना मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारल्याची भाषा केली.