याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील बसस्टॉपसमोर मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होणार आहे. सदरची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस नाईक नीलेश खैरे, पोलीस जवान सुदर्शन माताडे, योगेश रोडे, व्ही. बी. वाघ यांनी तात्काळ भराडी येथे जाऊन त्या परिसरात सापळा रचला.पोलीस पथक लपून बसले होते. शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक (एम.एच.14 बी 5304) यावर दोन इसम आले.पोलीस पथकाला पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दुचाकी वाहन आडवले. दोघांची चौकशी करून त्यांच्या जवळ असणाऱ्या ड्रममध्ये पाहिले असता दोन मांडूळ जातीचे साप आढळून आले. आरोपींनी त्यांची नावे संभाजी बाबूराव राजगुरू ( रा. भराडी, ता. आंबेगाव) व सुनील दिलीप पवार (रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) सांगितले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस नाईक नीलेश खैरे करत आहे.
या मांडूळ जातीच्या सापांना वनखात्याच्या ताब्यात दिले असून त्यांना निसर्ग सहवासात सोडून देणार असल्याचे सांगितले.