पिंपरी सांडस :केसनंद, भावडी, शिंदेवाडी या परिसरातील विद्युत रोहित्रांचे नुकसान करून त्यातील तांब्याच्या तारा चोरी करून नेणाऱ्या दोन सराईतांना लोणीकंद गुन्हे शोध पथकाने वाघोली येथे पकडले असून त्यांचेकडून तांब्याच्या तारा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
परमेश्वर चांदप्पा नडगिरे (वय २२ रा. खांदवेनगर, वाघोली), बबलू लालू मिया उर्फ सहा (वय २७ रा. मगरवस्ती, लोणीकंद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : शिंदेवाडी येथे रस्त्याच्या कडेला असणारा विद्युत डीपी खाली पाडून त्यातील ७० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणीकंद गुन्हे शोध पथक वाघोली गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोघे जण दुचाकीवरून संशयितरित्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सामान घेऊन जात असताना दिसले. गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे विद्युत डीपी मधील तांब्याच्या तारा मिळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल हा भावडी, केसनंद, शिंदेवाडी या ठिकाणाहून चोरून आणलेबाबतची कबुली दिली. त्यांच्याकडील १२० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व दुचाकी असा एकूण ९० हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत विद्युत डीपी चोरीचे ४ गुन्हे उघड झाले आहेत व आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत पडळकर गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, दत्ता गायकवाड, संजय नातू, राजेश कर्डिले, सुभाष गारे यांनी केली आहे.