पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक (बीओई) येत्या मंगळवारी (दि.९) आयोजित केली आहे. त्यात १५ मार्चपासून परीक्षा घेणार की पुढे ढकलणार, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कंपनीकडूनच ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत परीक्षेसंदर्भातील गोंधळावर पडदा पडेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ मार्च आणि ३० मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या बीओईच्या बैठकीत घेतला होता. मात्र, परीक्षेचे काम जुन्याच एजन्सीला देणे नियमाला धरून नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. त्यामुळे येत्या १५ मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु, विद्यापीठाने अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
विद्यापीठाने परीक्षेबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. परीक्षेसंदर्भातील निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीतच घेतले जातात. त्यामुळे परीक्षेसाठी एजन्सी निवडणे आणि परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यासाठी येत्या मंगळवारी बीओई आयोजित केली आहे. तसेच, येत्या १० मार्च रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. त्यात परीक्षेसंदर्भातील सर्व धोरणात्मक बाबींवर अंतिम निर्णय होणार आहेत. परिणामी, पुढील दोन दिवसांत परीक्षेतील गोंधळावर पडदा पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.