भोर - कोकणात जाणारा जवळचा मार्ग असल्याने भोर- महाड मार्गावरील वरंधा घाट मार्गे प्रवास करण्याकडे प्रवास नागरिक आणि वाहन चालकांचा अधिक कल असतो. मात्र, महाडच्या दिशेला दरड पडल्यामुळे वरंधा घाटातून फक्त लहान गाड्यांची वाहतुक सुरु आहे. मोठया आणि अवजड वाहनांना वाहतुक करण्यास परवानगी नाही.परंतु, काही चालक या नियमांकडे दुर्लक्ष करून सर्रास या मार्गे वाहतूक करतात. अशाचप्रकारे एक ट्रक बुधवारी सकाळपासून घाटात अडकून पडला.त्यामुळे घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. भोर- महाड रस्त्यावरील वरंधा घाटाच्या महाडच्या हद्दीत रस्त्याची जुनी संरक्षक भिंत मागच्या महिन्यात कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावर सायंकाळी ५ ते सकाळी ८ या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून,फक्त सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत दुचाकी व चारचाकी लहान गाड्या काही प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील रस्ता बंद असल्याचे फलक अनेक ठिकाणी लावले आहेत. तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या अवजड वाहनांच्या चालकांना घाट बंद असल्याबाबत सांगत आहेत.मात्र तरीही चालक त्याकडे दुर्लक्ष करून हेकेखोरपणे घाटातूनच प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा अवजड वाहने घाटात अडकुन बसण्याच्या घटना घडतात.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 20:12 IST
घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या..
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प
ठळक मुद्देवरंधा घाटातील पडलेली संरक्षक भितीचे काम लवकर करण्याची मागणी