लोणावळा : राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची गावाची निसर्ग वादळाने पुरती धुळधान केली आहे. 25 घरांचे गाव असलेल्या राजमाची गावातील 20 घरांचे पत्रे उडाले आहेत, काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. शेजारी असलेल्या वन्हाटी ठाकरवाडीतील 16 घराची वस्ती पुरती उडून गेली आहेत.
आज सकाळी पावसाचा जोर व वार्याचा वेग कमी झाल्याने नगरसेवक राजु बच्चे, विशाल पाडाळे यांनी शासकिय यंत्रणेसह राजमाची गावाकडे धाव घेतली. राजमाची गावाला जाण्याकरिता पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना घरी दुरुस्तीची कामे करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागणार आहे. राजमाची गावाप्रमाणे वन्हाटी ही ठाकरवस्ती पुर्णपणे उडून गेली आहे. याठिकाणी असलेल्या 16 कुठुबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासनाने तात्काळ याभागाचा पंचनामा करत त्यांना मदत करावी अन्यथा त्यांनी तात्पुरती दुसरीकडे राहण्याची सुविधा करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.