पुणे : ख्रिसमसपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि दारू पिऊन वाहन चालविण्याच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता, वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी रात्रीपासूनच शहराच्या विविध भागांमध्ये ब्रीद अनालायझरच्या साह्याने मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिले आहेत.गुरुवारी नाताळ आहे. साधारणपणे नाताळच्या दिवसापासून नववर्ष उजाडेपर्यंत विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या काळात रेस्टॉरंट, हॉटेल, बारमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण जमतात. मद्य पिऊन गाडी चालवणे हे त्यांच्या आणि इतरांच्याही जीविताला धोकादायक ठरू शकते. म्हणून वाहतूक पोलिसांकडून गुरुवारपासून ३१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्वच्या सर्व ३० वाहतूक विभागांना मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांनाही जागोजागी नाकाबंदी आणि वाहनतपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेचे ६ कर्मचारी आणि अधिकारी जागोजागी वाहनांची आणि वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध खटला भरून त्यांना अटक करता येते. अटक वाहनचालकांना न्यायालयातून जामीन मिळवावा लागतो. त्यामुळे कारवाई टाळण्यास तसेच सुरक्षिततेसाठी दारू पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मद्यपी वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम
By admin | Updated: December 25, 2014 05:03 IST