लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाच्या आदेशानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ८ हजार ९०० सभासदांपैकी ५ हजार ३९६ ठराव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अ, ब, क आणि ड वर्गातील ७ हजार २३५ संस्था सभासदांपैकी ३ हजार ७३१ संस्थांचेच (५१.५६ टक्के) ठराव प्राप्त झालेले आहेत, तर ३ हजार ५०४ संस्थांचे ठराव प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरणार आहे.
जिल्ह्यातील विविध सहकारी सभासद संस्थांकडून सदस्यांचे ठराव मागविण्यात येतात. त्यानुसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतदार यादी निश्चित केली जाते. जिल्हा बँकेच्या एकूण सभासदांतील अ वर्गातील १ हजार ३१४ पैकी १ हजार ३०४, ब वर्गातील ११४ पैकी ९७, क वर्गातील १ हजार ६१६ पैकी ८४५ ड वर्गातील ४ हजार १९१ पैकी १ हजार ४८५ सभासदांचेच मतदानाचे ठराव प्राप्त झाले आहेत, तर व्यक्ती सभासदांतील सर्व म्हणजेच १ हजार ६६५ व्यक्ती मतदान यादीत आहेत. थकबाकीदार संस्था सभासद ३३ असून
अवसायनातील व नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची संख्या २०६ आहे. म्हणजे २३९ संस्थांचा निर्णय आक्षेप, हरकती व सूचनांवर अवलंबून राहील. निवडणुकीत थकबाकीदार सभासदांना मतदान अधिकार नाही. ड वर्गातील २ हजार ७०६ संस्था आणि क वर्गातील ७७१ संस्थांचे मतदानाचे ठराव आले नाहीत.
जिल्हा बँकेची प्राथमिक मतदारयादी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर), जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण), जिल्हा बँक मुख्यालय आणि तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी संगीता डोंगरे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
------