सुधीर लंके , पुणे‘सनातन’ने पोलिसांनाच धमकीवजा इशारा दिला असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे सनातनने यू टर्न घेत आपल्या संकेतस्थळावर याबाबत खुलासा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पोलिसांना अध्यात्मिक शिक्षा करणार आहोत, असे त्यांनी या खुलाशात म्हटले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून नाहक छळ होत असल्याचा सनातन संस्थेचा आरोप आहे. यासंदर्भात या संस्थेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मजकुरात ‘साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांची नावे सनातनने नोंद केली असून, या पोलिसांना हिंदू राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा केली जाईल’ असे म्हटले आहे. ही पोलिसांसाठी धमकीच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘सनातन’च्या या मजकुराचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे निदर्शनास येताच ‘सनातन’ने बचावात्मक पवित्रा घेत स्वत: आपल्या संकेतस्थळावर याबाबत खुलासा प्रसिद्ध केला आहे. ‘पोलिसांना शिक्षा करणार’ हे विधान आम्ही अध्यात्मिक अंगाने केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अध्यात्मिक कार्यासाठी व्यक्तींची नावे नोंद का करावी लागतात? तसेच अशी कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार सनातनला कोणी दिला? याबाबत मात्र या खुलाशात काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. आगामी हिंदू राष्ट्र असे संबोधून त्यांनी सध्याचे राष्ट्रही एकप्रकारे मोडीत काढले आहे. ‘सनातन’ची ही सांकेतिक भाषा आहे, असाही या धमकीचा अर्थ काढला जात आहे.
पोलिसांना धमकी आध्यात्मिक दृष्टिकोनातून
By admin | Updated: September 21, 2015 03:55 IST