दौंड : येथील भीमानदीवरील पुलावर बुधवारी (दि. २६) वाळूच्या ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अशोक सांगळे (वय ४२) आणि संदीप सोनवणे (वय २५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार अशोक सांगळे यांच्या पत्नीने दौंड पोलिसांत दिली. त्यानुसार वाळू ट्रक (एमएच १२-सीटी ७०२)चे मालक अंकुश नलगे (वय ४०, रा. सांगवी, ता. श्रीगोंदा), नवनाथ गिरमे (वय ४१), खंडू गिरमे, संजय गिरमे, रेवनाथ गिरमे, सुभद्राबाई गिरमे (सर्व रा. गोपाळवाडी, ता. दौंड) व वाळू ट्रकचालक (नाव समजले नाही) अशा एकूण सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अंकुश नलगे, नवनाथ गिरमे या दोघांना अटक केली आहे. अपघातात ठार झालेले दोघेही मामा भाचे आहेत. अपघात झाल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. गुरुवार (दि.२७) रोजी दोन्ही मयतांच्या नातेवाईक आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केली होती. नवनाथ गिरमे, खंडू गिरमे, संजय गिरमे, रेवनाथ गिरमे, सुभद्राबाई गिरमे यांनी कट रचून माझ्या पतीचा घातपात केला असल्याची फिर्याद मयत अशोक सांगळे यांच्या पत्नीने पोलीसांना दिली. जोपर्यंत आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दोघाही मृताचे शवविच्छेदन होऊ देणार नाही परिणामी दोन्ही मृतदेह दौंड तहसील कचेरीसमोर ठेवण्यात येतील असा पावित्रा शोकाकुलांनी घेतला होता. यावेळी जमाव प्रक्षोभक झाला होता. एकंदरीतच परिस्थिती पाहता पोलीसांनी दोघांवर गुन्हाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. आज दुपारच्या सुमारास अशोक सांगळे यांच्यावर गोपाळवाडी (ता. दौंड) येथे तर संदीप सोनवणे यांच्यावर दौंड-पाटस रोडवरील सोनवणेमळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघात नसून घातपात?
By admin | Updated: October 28, 2016 04:28 IST