समीरण वाळवेकर, ज्येष्ठ माध्यमकर्मी
पुण्यात एक कमाल अनुभवण्याचं भाग्य मला मिळालं! ही कमाल फारच चित्तथरारक आणि अभूतपूर्व चित्रपट अनुभव देणारी ! भारतातील पहिल्या संपूर्ण डॉल्बी सिनेमाला पुण्यात खराडीमधील ‘सिटी प्राइड’मध्ये सुरुवात झाली. या अभूतपूर्व आरंभाला उपस्थित राहून भन्नाट तंत्रज्ञानाचा खास अनुभव घेता आला.डॉल्बी साउंड आपल्याला नवा नाही. ‘फोर’ के पिक्चरही नवा नाही; पण ‘डॉल्बी सिनेमा विथ डॉल्बी ॲटमॉस ऑन फोर के लेझर प्रोजेक्टर’ हे अफाट आहे. यातून पडद्यावर दिसणारा चित्रपट सर्वोत्तम दर्जा तर दाखवतोच; पण रंग, कॉन्ट्रास्ट आणि काळ्या रंगाच्या करामतीने आजूबाजूचे अदृश्य ७० स्पीकर्स जेव्हा घुमू लागतात, तेव्हा हृदय धडधडतं आणि रंगांच्या लाखो छटा बघून डोळे सुखावतात!
जगातील सर्वोत्तम दृक् श्राव्य अनुभव तो हाच, याची खात्रीच पटते. अर्थात १८० अंशांतील किंवा प्रेक्षकांच्या सर्व बाजूंनी, खालून, वरून आजूबाजूला दृश्ये दाखवणारी चित्रपटगृहेही जगात आज आहेत, आपल्याकडेही येतील, तोही छाती दडपवणारा अनुभव असणार आहेच; पण हा आत्ताचा अनुभव त्या दिशेनं नेणारा आहे.
हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुण्यात आणि भारतात प्रथम आणण्याचं श्रेय जातं ते अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर आणि त्यांच्या मुलांना. आज चाफळकर कुटुंबीय सुमारे चाळीस चित्रपटगृहे चालवतात. नवोदित चित्रपट निर्माते दिग्दर्शकांना त्यांचा फार मोठा आधार आणि मार्गदर्शन असतं. हे नवं चित्रपटगृह, हे त्यांची पुढची पिढी किती सजग, जागतिक तंत्रज्ञानाचा भान आणि जाण असणारी आहे, याचंच द्योतक आहे. हैदराबाद, बंगळुरू, मुंबई आणि देशातील सर्व भागांतील चित्रपटगृहांचे मालक उत्सुकतेनं हा तांत्रिक आविष्कार पाहायला येतात, यातच त्यांचं यश आहे. यानंतर हैदराबाद, बंगळुरू, त्रिची, उल्लिकल आणि कोईमतूर इथे पुढच्या काही महिन्यांत अशीच चित्रपटगृहे तयार होत आहेत; पण हा चाफळकरांचा पहिला यशस्वी प्रयत्न सर्वांत महत्त्वाचा!
डॉल्बी कंपनीनं या वेळेस खास प्रेझेंटेशन करताना हे तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय हे समजावं म्हणून जगातील काही भन्नाट चित्रपटांतील काही प्रसंग या नव्या थिएटरमधे मुद्दाम दाखवले. एक तर संपूर्ण काळोखात आपण अवकाशात आहोत असा भास होतो! काळोख म्हणजे संपूर्ण अंधार. प्रकाशाची छोटी तिरीपही नाही. या थिएटरमधे प्रत्येक इंच डॉल्बीच्या स्पेसिफिकेशन्सनुसार, त्यांच्याच तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बनवलाय!
प्रचंड मोठा विशिष्ट आकाराचा स्क्रीन... तीनशे दहा प्रेक्षकांभोवती भिंतीच्या आत, कोणालाच न दिसणारे, सर्व बाजूंना बसवलेले धडधडणारे सुमारे ७० प्रचंड शक्तिशाली स्पीकर्स... मागे प्रोजेक्शन रूममध्ये जगात या क्षणाला उपलब्ध असलेली दोन सर्वांत अत्याधुनिक फोर के लेझर प्रोजेक्टर सिस्टम... यावेळीच खास दाखवलेल्या काही सीन्सपैकी टॉम क्रूझच्या ‘टॉप गन’मधील विमानाचा टेक ऑफ बघताना आपण अक्षरशः त्याच्याजवळून टेक ऑफ घेत आहोत असा फील आला. ‘बॅटमॅन’, ‘बार्बी’, ‘पुष्पा’, अशा अनेक चित्रपटांत हे तंत्रज्ञान कसं वापरलं गेलंय आणि ते किती प्रभावी झालंय याचा प्रत्यक्ष अनुभव प्रेक्षकांना देण्यात आला.
ते तंत्रज्ञान जगभर फक्त १८०० चित्रपटगृहात वापरलं गेलं आहे; पण आपल्या देशात थिएटरमधे ते तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्याचा आनंद घेता आला नव्हता. आता तो घेता येणार आहे. ध्वनी आरेखनासाठी ऑस्कर मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करण्याऐवजी ध्वनी आरेखक रसूल पुकुट्टी म्हणाला होता, ‘आपल्याच देशात जागतिक ध्वनी आरेखन होऊ शकतं; पण ते ऐकण्या-पाहण्यासाठी सक्षम यंत्रणा व चित्रपटगृहे नाहीत, हे दुर्दैव आहे !’
आपल्या ‘पुष्पा’चं उदाहरण उत्कृष्ट ध्वनी-चित्र आरेखनासाठी ब्रिटिश डॉल्बी चमूने प्रत्यक्ष दाखवलं, यातच सगळं आलं! यापुढे रसूल पुकुट्टीला खंत करण्याची वेळ येणार नाही. कारण आपल्या देशात जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाने तयार केलेले चित्रपट तितक्याच सर्वोत्तम यंत्रणेवर दाखवून मूळ अपेक्षित अनुभव ताकदीनं देणारी चित्रपटगृहे तंत्रज्ञानाने सिद्ध असतील!
डॉल्बी ॲटमॉस साउंड तर कमाल आहे! ज्या बाजूला दृश्य दिसते तिकडूनच आवाज पास होतो. तुमच्या पुढून, मागून, डावीकडे, उजवीकडे... सर्वच दिशांना आवाज विहरत असतो..., हे इतर थिएटरमधे १०.१ सिस्टममध्ये ऐकू येते, इथे फक्त ७० स्पीकरमधून!!! हा प्रचंड फरक थरकाप उडवतो.खरी गंमत आहे पडद्यावर दिसणाऱ्या ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्टमध्ये. कॉन्ट्रास्ट रेशो आहे ‘१०,००,००० : १’ आणि ब्राइटनेस आहे ‘१००००cd/m2 !’ त्यामुळेच दिसणारे चित्र लख्ख, लोभस आणि देखणे दिसते, अगदी अंधारातील दृश्यातसुद्धा! चित्रपटातील प्रत्येक फ्रेमचे रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस हवा तसा दाखवता येतो!
या अत्याधुनिक थिएटरला बनवायला सव्वा वर्ष लागलं. पुष्कराज चाफळकरने यावेळी स्वतः आपल्या चमूने किती कष्ट घेतले हे आवर्जून सांगितलं. एकूणच, ही अत्यंत प्रभावी अनुभव देणारी यंत्रणा संपूर्ण भारतात प्रथम पुण्यात आली, ती पहिल्याच दिवशी आम्हाला बघता आली आणि कमालीचा प्रभावी आनंद देऊन गेली....!