पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. मात्र पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळल्यामुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६६ राहणार आहे.
राज्य सरकारने यापूर्वी पुण्यासह राज्यात इतर महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्याचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश देऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते. हे काम सुरू असतानाच एकऐवजी दोनचा प्रभाग होण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. मात्र, राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती सूचना घेऊन ती अंतिम करण्यात आली होती. आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने तीनचा प्रभाग रचना करून आपल्या सोयीनुसार मतदारसंघ केल्याचा आक्षेप भाजपने घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांतील नियमबाह्य पद्धतीने वाढविलेली सदस्यसंख्या त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली. त्यानंतर अनेक महापालिकांत प्रभागांची संख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवली होती. ही वाढवलेली संख्याही कमी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणुका २०१७ प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने १७ जानेवारी २०२२ रोजी काढलेल्या राजपत्र (गॅझेट)मध्ये प्रत्येक प्रभाग दोन पेक्षा कमी आणि चार पेक्षा जास्त नसावा, असेे नमूद केले आहे. हे राजपत्र रद्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रभाग रचना चार सदस्यीय होणार आहे.
नगरसेवकांची संख्या ७ ने कमी होणार
पुणे महापालिकेतील २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी तीनचा प्रभाग केला होता. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्यसंख्या वाढविली होती. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १७३ झाली होती. मात्र आता नगरसेवकांची संख्या १६६ होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ७ ने कमी होणार आहे.
इच्छुकांच्या आशा पल्लवित
पुणे महापालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली. त्या अगोदर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना एक, दोन आणि तीनची होणार यावर सातत्याने चर्चा झाली. अखेर महाविकास आघाडी सरकारने या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आरक्षण सोडत घेऊन प्रभाग रचनाही जाहीर केली. या रचनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
जनगणना न झालेल्याचा असाही फटका :
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे देशाची जनगणना झाली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाणार आहे. त्याचा फटका नगरसेवकांच्या संख्यावाढीला बसणार आहे. पुण्याची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३५ लाख आहे. पण, मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे लोकसंख्या ३५ लाख आणि मतदारसंख्या ३२ लाख आहे. कदाचित मतदारांची संख्या अधिक वाढू शकणार आहे.
३५ लाख ५६ हजार ८२४
पुण्याची एकूण लोकसंख्या
४ लाख ८० हजार ०१७
अनुसूचित जाती (एसी)
४१ हजार ५६१
अनुसूचित जमाती (एसटी)