रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 09:21 AM2023-09-24T09:21:41+5:302023-09-24T09:22:06+5:30

रणवाद्यांवर आता ‘ती’ हुकूमत गाजवतेय. ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये, हाच संदेश यातून मिळतोय.

The rule of 'she' on weapons! No one should underestimate her | रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये

रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये

googlenewsNext

श्रीकिशन काळे, वरिष्ठ उपसंपादक  

जिच्या मनगटात दम तोच वाजवेल ढोल-ताशा’ असे पूर्वी म्हटले जायचे. मुली कशा नाजूक, फुलांसारख्या कोमल. त्यांना एवढा मोठा ढोल पेलवेल का? त्यांच्या हातात ढोल वाजवायला शक्ती तरी असते का? अशा अनेक प्रश्नांना मुलींनी ढोलवादनातून सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात ढोलवादनात मुलींची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे आता तर गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशा वादनामध्ये मुलींचीच पथके अधिक पाहायला मिळतात. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या रणवाद्यांवर आता ‘ती’ हुकूमत गाजवतेय. ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये, हाच संदेश यातून मिळतोय.

ढाेल पथकांची मुहूर्तमेढ रोवली होती ती मुळशी-मावळातील ग्रामीण पथकांनी. हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. आज मुलांसोबतच पुण्यात मुलींचा संघ असलेली अनेक ढोल-ताशा पथके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये शिवमुद्रा, शिवगर्जना, श्रीराम, शौर्य, नादब्रह्म, रुद्रगर्जना यांसारख्या ढोल पथकांचा समावेश आहे.

ढोल-ताशाचे अर्थकारण काय? 
लोकांंना वाटते की, ढोल-ताशामध्ये खूप पैसा असेल; पण तसे काही नाही. बँडवादक हे पोटासाठी वाजवतात. ढोल-ताशा पथकांचे तसे नाही. पथकांमध्ये हौस म्हणून वाजवायला येतात. केवळ आनंद मिळावा आणि गणरायाला सेवा द्यावी म्हणून तरुण-तरुणी येतात. जर एका वादनाचे शंभर रुपये मिळाले, तर त्यातील ३० टक्के खर्च ढाेलाच्या पानावर, टिपरे, फस्ट एड बॉक्स यावर होतो. वाहतुकीवर २० टक्के, तर वादकाच्या जेवणखाण, पाण्यावर २० टक्के खर्च होतो. इतर दहा टक्के खर्च येतो. मग खाली केवळ २० टक्के मार्जिन राहते. ते देखील चांगले पथक असेल तरच. पथकांना सर्व ठिकाणी सारखे पैसे मिळत नाहीत. कुठे कमी, तर कुठे जास्त मिळतात.
- पराग ठाकूर, अध्यक्ष, अखिल ढोल-ताशा वादन महासंघ, पुणे

ढोल पथकाचा अनोखा इतिहास? 
डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच अप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्यात ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल-ताशा पथकाला सुरुवात केली. 

मुलींचा सहभाग कधीपासून? 
ज्याच्या मनगटात ताकद त्यांनीच हे वाद्य वाजवावे, अशी धारणा होती. मुली अतिशय सुंदर ढोल वाजवू लागल्या. ताशा आणि ध्वजामध्येही त्या कमी पडल्या नाहीत. खरंतर ताशा वाजवायला खूप अवघड असतो; पण त्यातही मुली पारंगत झाल्या. आज केवळ महिला असलेली अनेक पथके आहेत. आम्ही २००० सालीच महिलांना पथकांमध्ये स्थान दिले होते, अशी माहिती अखिल ढोल-ताशा पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी दिली.

१९६५ मध्ये पुण्यात गणेशोत्सवात दंगल झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीमध्ये वाद्य वाजविण्यासाठी सक्त मनाई केली होती; परंतु पोलिसांच्या या निर्णयाला अप्पासाहेबांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर स्वत: गळ्यात ताशा घेऊन ते लक्ष्मी रोडच्या चौकामध्ये आले आणि तिथे उभे राहून त्यांनी वादन सुरू केले. पुणेकरांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. नंतर १९७५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेत पहिले ढोल पथक स्थापन झाले. 

सांस्कृतिक परंपरेला सुरुवात
ढोल-ताशाचा संबंध आपल्याकडे प्राचीन काळापासून पाहायला मिळतो. युद्धामध्ये रणवाद्य म्हणून ढोलाकडे पाहिले जाते. तेव्हा अतिशय शक्तिशाली असणाऱ्या पुरुषाला हे वाद्य वाजविण्याचा मान मिळत असे. ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वज यामुळे आपल्या वादनातून एका अर्थाने आपली सांस्कृतिक परंपरा निर्माण झाली. १८९४ मधील विसर्जन मिरवणुकीत पुण्यात १२० गणपती होते. त्यावेळी लेझीम, घुंगरू, चौघडे अशा मंगलमय सुरांमध्ये गणपतींचे विसर्जन झाले होते. त्यानंतर गणपतीपुढे ढोल-लेझीमच्या ताफ्यांमुळे मिरवणुकीचा दिमाख आणखी वाढला; परंतु १९६५ च्या उत्सवामध्ये युद्ध आणि दंगलींमुळे गालबोट लागले. तेव्हा मिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी घालण्यात आली. मावळ-मुळशी या भागात तरुणांनी ढोल-ताशा पथके स्थापन करायला सुरुवात केली होती; तसेच उत्सवात घातक प्रथाही सुरू होऊ लागल्या होत्या. 

नव्या प्रथांनी अस्वस्थ होऊन ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (कै.) अप्पासाहेब पेंडसे यांनी कोंढणपूरच्या गुलाबराव कांबळे या ताशावादकाला जत्रेमध्ये पाहिले. या कलाकाराला बरोबर घेऊन शिस्तबद्ध शालेय पथकांची जोड देऊन मिरवणुका ताल-सुरांत रंगवू शकतो, अशी मनोकामना पेंडसे यांची होती. 
या पथकांना शिस्तबद्ध अनुशासनाची जोडदेखील मिळेल म्हणून पेंडसे यांनी १९६५ च्या सुमारास ज्ञानप्रबोधिनीच्या ‘बर्ची-भाला-ध्वज’ पथकाची स्थापना केली. तेव्हापासून पुण्यात ढोल-ताशा पथकाला प्रारंभ झाला. 

 

Web Title: The rule of 'she' on weapons! No one should underestimate her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.