पुणे : शहरातील जल्लोषमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता यंदा अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीला शनिवारी होणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. यासाठी विसर्जन मार्ग व घाटांवर डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत मिळावी, यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
महापालिकेकडून १५ वैद्यकीय पथके, सुमारे ८० डॉक्टर व २०० आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच १५ क्षेत्रीय अधिकारी व ५ परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवांचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथकेदेखील नियुक्त करण्यात आली आहेत.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोरील बेलबाग चौक येथे गेल्या अकरा दिवसांपासून कार्यरत असलेला आरोग्य कक्ष विशेष लक्षवेधी ठरणार आहे. येथे तीन आयसीयू बेडसह आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, विसर्जनाच्या दोन दिवसांसाठी पालिकेच्या १२ दवाखान्यांच्या ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात १० बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत.
शनिवारी महापालिकेला सुट्टी असली तरी आरोग्य विभागातील जवळपास ३०० कर्मचारी, अधिकारी व डॉक्टर कार्यरत राहून आरोग्य सेवा देणार आहेत. शहरातील विविध भागात १०८ क्रमांकाच्या व महापालिकेच्या मिळून एकूण ३० रुग्णवाहिका तैनात राहणार असून, त्या घटनास्थळी तातडीने पोहोचून रुग्णांना दवाखान्यात हलवण्याचे काम करतील.
गणेशोत्सवाच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. या काळात मिरवणुकीतील कार्यकर्ते, ढोल पथकातील वादक, देखावे मांडणारे कलाकार तसेच मिरवणुका पाहण्यासाठी आलेले नागरिक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काहीवेळा तातडीची वैद्यकीय मदत लागते. अशा परिस्थितीत महापालिकेचा आरोग्य विभाग प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही सज्ज असून, आवश्यक ती वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध करून देणार आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात आरोग्य व्यवस्था
- विसर्जन मिरवणुकीदरम्यान १५ वैद्यकीय पथके सज्ज- ८० डॉक्टर, २०० कर्मचारी कार्यरत- बेलबाग चौकात ३ आयसीयू बेडसह आरोग्य कक्ष- पालिकेच्या १२ दवाखान्यांत ओपीडी सुरू- कमला नेहरू रुग्णालयातील १० खाटा राखीव- शहरात एकूण ३० रुग्णवाहिका सज्ज