ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरूणाचा मृत्यू? नातेवाईकांचा आराेप, रुग्णालयाने आराेप फेटाळाले

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 2, 2024 07:51 PM2024-04-02T19:51:37+5:302024-04-02T19:52:55+5:30

रुग्णालय प्रशासनाने हे आराेप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे...

The death of a young man due to rat bite in Sassoon? Allegations of the relatives, the hospital rejected the allegations | ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरूणाचा मृत्यू? नातेवाईकांचा आराेप, रुग्णालयाने आराेप फेटाळाले

ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरूणाचा मृत्यू? नातेवाईकांचा आराेप, रुग्णालयाने आराेप फेटाळाले

पुणे :ससून हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या आयसीयूमध्ये एका तीस वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान साेमवारी मृत्यू झाला. दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातामध्ये मणक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सूरू हाेते. मात्र मृत्यू उंदराच्या चाव्यामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने हे आराेप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सागर रेणुसे (वय ३० वर्ष, रा. भाेर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. रेणुसेचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्याच्यावर ट्राॅमा आयसीयूमध्येही उपचार सुरु होते. दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आयसीयुमध्ये उंदराने चावा घेतल्यामुळे ताे मृत्यू झाल्याचा आराेप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेची देखभाल हाेत नसल्याचा आणि उंदरांचा प्रादुर्भाव झाल्याचा दावाही नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, हा रुग्ण १७ मार्च रोजी पुलावरून जात असताना दुचाकीवरून पडला. पडल्यानंतर त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याने त्याला आधी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व नंतर ससूनला दाखल केले. अपघातामुळे त्याच्या शरीराच्या वरच्या बाजुची संवेदनाही गेली हाेती. तसेच २५ तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दि. 29 रोजी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले हाेते.

दरम्यान नातेवाईकांनी 1 एप्रिल राेजी सोमवारी सकाळीच त्याला उंदीर चावला असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली हाेती. सोमवारी सायंकाळी या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. याबाबत अधिक माहिती देताना ससून रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे म्हणाले, जुन्या इमारतीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हा रुग्ण उपचारासाठी दाखल हाेता. एका वेळी १७ रुग्णांना या आयसीयुमध्ये दाखल केले जाऊ शकते आणि बहुतेक वेळा आयसीयु भरलेले असते. येथे दर तीन दिवसांनी एकदा पेस्ट कंट्रोल करण्यात येते आणि या सेंटरच्या बाहेर आठवड्यातून एकदा निर्जंतुकीकरणही करतो.

Web Title: The death of a young man due to rat bite in Sassoon? Allegations of the relatives, the hospital rejected the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.