पुणे: महात्मा गांधी यांचा विचार समजून घेण्यात देश कमी पडला. आजच्या पिढीला तर गांधी विचार माहितीही नाही. आजही देशाला बापूंच्या विचारांवर चालण्याची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. गांधी विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त गांधी भवन येथे गुरूवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता खासदार सुळे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व भजन झाले.
खासदार सुळे म्हणाल्या, "मला जेव्हा अस्वस्थ वाटते, तेव्हा मी वर्ध्याला बापू कुटीमध्ये जाऊन येते. वर्षातून किमान दोनदा तरी तिथे जाऊन मनाला शांती मिळवते. आजची पिढी बापूंना समजून घेण्यासाठी कमी पडत आहे. बापूंना समजून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत." वर्षभरात गांधी भवन येथे सहा कार्यशाळांचे आयोजन करून गांधी विचारांचे १,००० कार्यकर्ते घडवण्याचा संकल्प सुळे यांनी केला. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये संपर्क मोहिम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. सप्तर्षी म्हणाले, “गांधीजींच्या प्रार्थना हे बीजारोपण आहे. त्यांचे स्मरण हे राष्ट्रपित्याचे स्मरण आहे. गांधीजींनी आयुष्यात कधीही प्रार्थना चुकवल्या नाहीत. महाराष्ट्रात,पुण्यातच नव्हे तर देशात, जगात गांधी विचार जिवंत ठेवला पाहिजे. गांधी स्मारक निधीची स्थापनाच या उद्देशाने झाली आहे. गांधी विचारांचे बीज आम्ही सांभाळून ठेवले आहे. त्याचा प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.”
आज काही जण आम्हाला नैतिकता शिकवू नका’, असे म्हणत आहेत. मात्र, देशातील आणि राज्यातील वातावरण अत्यंत बिघडले आहे. नैतिकतेची खरी गरज आज आहे, त्यासाठीची लढाई सातत्याने लढली पाहिजे.- खासदार सुप्रिया सुळे