पुणे : महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी होणार असून शहर वाहतूक शाखेने वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. शिवाजीनगर येथील धान्यगोदामामध्ये जिल्हा परिषदेची मतमोजणी होणार असल्याने येथील वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळवण्यात आली आहे. शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौकादरम्यानच्या न्यायमूर्ती रानडे पथावर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे चौक (डेंगळे पुल) ते धान्यगोदाम दरम्यानही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. कामगार पुतळा ते धान्य गोदामादरम्यानही वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्यांची वाहने सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर लावावित. यासोबतच शिवाजी मिलीटरी हायस्कूल, कृषी महाविद्यालय मैदान येथील पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर वानवडी येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनामध्ये होणाऱ्या मतमोजणीसाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जगताप चौक ते महाराष्ट्र बँक चौकादरम्यान वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासोबतच हडपसर आणि भैरोबानाला येथून जाणाऱ्या जड वाहनांना फातिमानगर चौकातून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांनी भैरोबानाला चौकाकडून इच्छितस्थळी जावे. फातिमानगरकडून येणाऱ्या वाहनचालकांनी बँक आॅफ इंडिया चौकाकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणीसाठी वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल
By admin | Updated: February 23, 2017 03:33 IST