पुणे : महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेचे वेळापत्रक अखेर संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. ही बससेवा सुरू झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला जाग आली. मात्र, अद्याप ई-कनेक्ट अॅपवर हे वेळापत्रक देण्यात आलेले नाही.पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी जागतिक महिला दिन म्हणजे दि. ८ मार्चपासून खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. सुरूवातीला दहा मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यात आली. काही दिवसांपुर्वी त्यात आणकी एका मार्गाची भर पडली आहे. हे नवीन मार्ग असल्याने महिला प्रवाशांना याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे या बसेसच्या वेळापत्रकाला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देणे आवश्यक होते. पण याकडे पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पीएमपीच्या संकेतस्थळासह ई-कनेक्ट अॅपवरही हे वेळापत्रक टाकण्यात आले नव्हते. याबाबतचे तेजस्विनीचे वेळापत्रक झळकेना हे वृत्त दै. लोकमतमध्ये दि. १५ मे रोजी प्रसिध्द झाले होते. त्यानंतर गुंडे यांनी वेळापत्रक संकेतस्थळ व अॅपवर टाकण्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या होत्या.तब्बल अडीच महिन्यांनंतर प्रशासनाने तेजस्विनीचे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले. त्यापुर्वी केवळ दोन विशेष बसेसच्या वेळाच झळकत होत्या. तसेच बसथांब्यांवरही याबाबत माहिती नाही. त्यामुळे किमान संकेतस्थळ व अॅपवरही तरी वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा महिला प्रवाशांकडून व्यक्त केली जात होती. आता संकेतस्थळावर वेळापत्रक आले असले तरी अद्यापही अॅपही वेळापत्रक येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तेजस्विनी बसचे वेळापत्रक अखेर संकेतस्थळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:35 IST
खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. या बसेसच्या वेळापत्रकाला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देणे आवश्यक होते.
तेजस्विनी बसचे वेळापत्रक अखेर संकेतस्थळावर
ठळक मुद्देकिमान संकेतस्थळ व अॅपवरही तरी वेळापत्रक असावे, अशी महिला प्रवाशांकडून अपेक्षा