जेजुरी : पुरंदर तालुक्यातील सुमारे ६०० शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा घोळ गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असून, शिक्षकांत प्रचंड नाराजी आहे. तर, सेवानिवृत्त शिक्षकांनी याबाबत पुरंदरच्या शिक्षण विभागाकडे तीन-तीन पत्रे देऊनही त्यांना योग्य तो न्याय न मिळाल्याने तेही हवालदिल झाले आहेत. पुरंदर तालुक्यात एकूण २२४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांतून सुमारे ६०० शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. पुरंदरचा शिक्षण विभाग प्रत्येक महिन्याला शिक्षकांचे पगार काढते. मात्र, मुळातच पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. अशातच गेल्या १ एप्रिल २०१४ पासून तालुक्यातील शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमा त्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत जमा झालेल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील सुमारे सहाशे शिक्षकांचे पगार पुरंदर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून होत आहेत. या विभागातील अनियमिततेमुळे शिक्षकांचे पगारही वेळेवर निघत नसल्याची तालुक्यातील शिक्षक संघटनांची नेहमीचीच ओरड आहे. यातच गेल्या १५ महिन्यांपासून शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला भविष्य निर्वाह निधीची रक्कम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दर महिन्याला वर्ग होत आहे. मात्र, कोणाची किती रक्कम, याची यादी ( शेड्यूल ) मात्र वेळेवर जात नसल्याने ती रक्कम जिल्हा परिषदेकडेच पडून राहत आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून पुरंदर पंचायत समितीकडे गेल्या १५ महिन्यांत तब्बल पाच वेळा पत्र देऊनही यादी मागवली आहे. मात्र, इथल्या ढीम्म प्रशासनाकडून ती अद्यापपर्यंत पोहोचलीच नसल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांनी त्यांच्या सर्व रकमा व्याजासह मिळाव्यात म्हणून शिक्षण विभागाकडे मागणीही केलेली आहे. ‘लोकमशी’शी संपर्क साधून त्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, पुरंदर पंचायत समितीकडे या संदर्भात पाच वेळा पत्रे दिली आहेत. मात्र, रकमांचे शेड्यूलच (याद्या) मिळाल्या नसल्याने ही दिरंगाई झालेली आहे. यास पंचायत समितीचा शिक्षण विभागच जबाबदार आहे. दरम्यान, कालच एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे शेड्यूल प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. या घोळामुळे मात्र शिक्षकांची चांगलीच होलपट झाली आहे. स्वत:चे हक्काचे पैसे त्यांना गरजेनुसार मिळू शकले नाहीत. बॅँकांची कर्जे काढतानाही अडचणी आल्याने शिक्षकवर्गातून प्रचंड असंतोष होता. येथील शिक्षक संघटनाही याबाबत आक्रमक झालेल्या आहेत. मात्र, सेवानिवृत्त शिक्षकांच्या पैशालाही व्याज मिळालेच पाहिजे, असा पवित्रा या संघटनांनी घेतला आहे. (वार्ताहर)
शिक्षकांच्या निधीचा घोळ
By admin | Updated: October 30, 2015 00:06 IST