तळेगाव ढमढेरे : येथील आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांना बसण्यासाठी येत्या आठवड्यात नियोजित जागा दिली जाणार आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूककोंडीचा होणारा प्रश्न त्यामुळे सुटणार असल्याने ग्राहक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)येथील आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षापासून सोमवारी भरतो. शिरूर, श्रीगोंदा, दौंड तालुक्यातून विविध प्रकारचे व्यापारी मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी येत असल्याने या बाजार मैदानात वाहन पार्किंगची सुविधा नसल्यामुळे दर सोमवारची वाहतूक कोंडी होत होती. याबाबत लोकमत वृत्तपत्रातून वाहतूक कोंडी संदर्भात अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेत ही वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्या संदर्भात नियोजन बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई सोनवणे व उपसरपंच मोहिनी पिंगळे यांनी सांगितले की पुढील सोमवारपासून ही व्यवस्था सुरु होणार आहे. सहाशेपैकी ५२० व्यापाºयांनी ग्रामपंचायतीकडे नावाची नोंदणी केलेली आहे. पुढील सोमवारपासून स्वतंत्र कापड, किराणा, फळे, पालेभाज्या, मासे-बोंबील विभाग तयार केले असून व्यापाºयांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्थाही वेळ नदीच्या जवळ केलेली आहे.बाजार स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने नदी काठालगत दहा बाय पंधरा फुटाचा खड्डा घेण्यात आलेला आहे. व्यापाºयांनी आपली बैठक व्यवस्था बाजार संपल्यानंतर स्वच्छ करून नेमून दिलेल्या जागेवर हा कचरा टाकण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केलेले आहे.बाजारातील व्यापारी व ग्राहकांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश तोडकर व गोविंद ढमढेरे यांनी सांगितले. बाजार मैदानातूनच तळेगाव ढमढेरे- न्हावरा रस्ता जात असल्याने दर सोमवारी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. पुढील सोमवार पासून हा रस्ता आता खुला ठेवण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश तोडकर, गोविंद ढमढेरे, रवींद्र शेलारआदी उपस्थित होते.पुढील सोमवारपासून व्यापाºयांना ठरवून दिलेल्या गाळ्यावर मालविक्रीसाठी एकूण सहाशेच्या दरम्यान सहा बाय सात फुटाचे गाळे बसण्यासाठी तयार केलेले आहेत. सहा फूट अंतर्गत रस्ते केलेले आहेत. सध्या व्यापाºयांची ही बैठक व्यवस्था शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.- ताई सोनवणे, सरपंच,तळेगाव ढमढेरेसद्यस्थितीला आठवडे बाजारातून फक्त दहा ते अकरा हजार रुपये कर वसुली होत आहे. हीच कर वसुली नवीन सुधारित आठवडा बाजारात पंचवीस ते तीस हजार रुपये एवढी होणार असल्याने ग्रामपंचायतीला पंधरा ते वीस हजारांचे उत्पन्न वाढणार आहे.-गोविंद ढमढेरे, सदस्य,ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे