लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. यात आरोग्य कर्मचारी,प्रशासकीय, पोलीस कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात विविध व्याधिग्रस्त व सर्व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणासाठी आधार क्रमांक व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे बंधनकारक आहे. परंतु, आजही अनेक लोकांचे आधार अपडेट नसल्याने कोरोना लसीकरणाच्या नोंदणीत अडचणी येत आहेत. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी सर्व आधार नोंदणी केंद्रांची बैठक घेऊन तातडीने शिबिरे घेऊन आधार नोंदणी व आधार अपडेट करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार सध्या तीन टप्प्यात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारचे आरोग्य कर्मचारी यांना, दुसऱ्या टप्प्यात सर्व फ्रंटलाईन म्हणजे सरकारी कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात विविध व्याधिग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणासाठी सरकारी कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी आधार क्रमांक व आधार मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ९९ टक्के लोकांची आधार नोंदणी झाली असली तरी आधार क्रमांक अपटेड नाही, म्हणजेच नाव, पत्त्यात बदल, आधार कार्ड मोबाईल लिंक नाही यामुळे लसीकरण नोंदणीत अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.१६) रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आधार नोंदणी केंद्रांची बैठक घेतली.
याबाबत उपजिल्हाधिकारी तथा आधार समन्वयक रोहिणी आखाडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे ४५० आधार नोंदणी केंद्र आहेत. यामध्ये ३०-४० ठिकाणी अडचणी असून, ही केंद्र देखील सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.