पुणे : सनदी लेखापालाचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना रोजगार व अनुभव मिळावा. तसेच त्यांच्यातील कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) 'ट्रेन, अर्न अँड लर्न' (टेल) हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती 'आयसीएआय'च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए मनीष गादिया यांनी सांगितली.
'आयसीएआय'च्या वतीने 'सहकार' विषयावर आयोजित दोन दिवसीय रिफ्रेशर कोर्सच्या निमित्ताने 'डब्ल्यूआयआरसी'चे पदाधिकारी पुणे भेटीवर आले होते. यावेळी बिबवेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनीष गादिया बोलत होते.या प्रसंगी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, डब्ल्यूआयआरसीच्या उपाध्यक्षा सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, 'विकासा'चे अध्यक्ष सीए यशवंत कासार, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए उमेश शर्मा, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
मनीष गादिया म्हणाले, "नोकरी अथवा व्यवसाय करण्यापूर्वी सनदी लेखापालातील नवनवी कौशल्य विकसित व्हावीत, तसेच शिकतानाच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना सीएकडे इंटर्नशिप देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर त्याला मानधन मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद हे या उपक्रमाचे ब्रँड अँबेसेडर आहेत.
समीर लड्डा म्हणाले, सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम हा शहरी भागातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही सीए होणे सुलभ झाले आहे.
दरम्यान, राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते 'सहकार' विषयावरील दोन दिवसीय रिफ्रेशर कोर्सचे उद्घाटन झाले. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा आहे. या क्षेत्राला अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी सनदी लेखापालांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे असल्याचे विश्वजित कदम यांनी नमूद केले.
-------------