पुणे : शहरात पावसाने अचानक जोर धरला असतानाच स्वाइन फ्लूची तीव्रताही वाढली आहे. शुक्रवारी या आजाराने ३ बळी घेतले.वातावरणात सातत्याने होणारे बदल विषाणजन्य आजारांना पोषक असल्याने विविध आजारांमुळे रुग्णांची संख्या वाढत असून, बळींच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या शहरातील १,०६८ रुग्णांंची तपासणी करण्यात आली. यांतील १२७ जणांना टॅमी फ्लू हे औषध देण्यात आले असून, १५ जणांचे कफाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यांपैकी ५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आज एकूण ३९ जण या आजाराने हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांतील ११ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या बळींच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी गर्दी होत असल्याने महापालिका प्रशासनाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे ३ बळी
By admin | Updated: September 19, 2015 04:41 IST