पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लंडनमधील वादग्रस्त भाषण असलेली सीडी न्यायालयात न चालल्याने फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी भाषणाचे दोन पेन ड्राइव्ह न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले होते. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलांनी फिर्यादीकडून सीडी रिकामी निघणे व गहाळ होणे ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असल्याचा युक्तिवाद करीत, या बाबीची न्यायालयीन नोंद घेण्यात यावी, यासाठी मंगळवारी न्यायालयात लेखी पुरशीस दाखल केली.
पुण्याच्या विशेष एमपी/एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल बदनामी खटल्याची मंगळवारी सुनावणी पार पडली. मागील वेळी फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी पुरावा म्हणून दोन पेन ड्राइव्ह न्यायालयात सादर करीत हे गांधी यांचे लंडनमधील भाषण असल्याचा दावा केला. ते न्यायालयात चालविण्याचा विनंती अर्ज केला होता. मात्र, राहुल यांचे वकील ॲड मिलिंद पवार यांनी या अर्जावर हरकत नोंदविली. लंडन येथील भाषणाची सीडी न्यायालयात चालवून पाहिली असता, ती पूर्णपणे रिकामी (नो डाटा) असल्याचे निष्पन्न झाले होते. दोन नवीन पेन ड्राइव्ह दाखल करण्याच्या प्रक्रियेवर ॲड. पवार यांचे म्हणणे मागविण्यात आले होते. यावेळी सीडी रिकामी निघणे व गहाळ होणे ही घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’ असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
ॲड. पवार यांनी युक्तिवादात नमूद केले की, दोन पेन ड्राइव्ह हा पूर्णपणे नवीन पुरावा असून, या टप्प्यावर नवीन पुरावा दाखल करण्यास कायद्याने मनाई आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, तसेच भारतीय पुरावा कायद्यात, अशा प्रकारच्या प्रक्रियेला कोणतीही परवानगी नाही. फिर्यादीने कोणताही ठोस व विश्वासार्ह पुरावा नसताना केवळ राजकीय हेतूने व राहुल गांधी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा खोटा बदनामीचा खटला दाखल केला असून, दोन नवीन पेन ड्राइव्ह दाखल करून घेण्याचा अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. या खटल्याची पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी होणार असून, त्या दिवशी दोन पेन ड्राइव्ह न्यायालयीन नोंदीत घेण्याबाबतच्या फिर्यादीच्या अर्जावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे.
Web Summary : In the Savarkar-Gandhi defamation case, Rahul Gandhi's lawyer argued that the empty CD and missing evidence was an 'Act of God'. The court will decide on admitting new evidence on December 18th.
Web Summary : सावरकर-गांधी मानहानि मामले में, राहुल गांधी के वकील ने तर्क दिया कि खाली सीडी और गायब सबूत एक 'दैवीय घटना' थी। अदालत 18 दिसंबर को नए सबूतों को स्वीकार करने पर फैसला करेगी।