पिंपरी : संत तुकाराम महाराज गाथेबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांना बुधवारी देहू येथे होणाऱ्या विराट हिंदू संमेलनातून माघार घ्यावी लागली. वारकरी संप्रदायाने देहूत येण्यापासून त्यांना रोखले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ येथील राष्ट्रीय चर्चासत्रात स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी बीजभाषण केले. या बीजभाषणात संतपरंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या गाथा हे संकलन असल्यामुळे त्या स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाहीत, असे भाष्य केले. त्यावर जोरदार टीका होत आहे.
देहूगाव येथे बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत गाथा मंदिराच्या मैदानावर विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात स्वामी गोविंददेवगिरी महाराज, हभप बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर, पांडुरंगमहाराज घुले आदी उपस्थित राहणार होते. ही माहिती वारकऱ्यांना आणि देहू देवस्थानच्या विश्वस्तांना मिळाली. त्यानंतर दुपारी बैठक झाली. त्यात त्यांनी गोविंददेवगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी विराट हिंदू संमेलनाच्या संयोजकांशी संवाद साधला व भूमिका समजावून सांगितली. वारकरी तीव्र नाराज आहेत. अशा परिस्थतीत गोविंददेवगिरी महाराजांनी देहूत येऊ नये, अशी वारकऱ्यांची भूमिका सांगितली. दरम्यान, काही वारकरी कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महाराज आले नाहीत.
नितीन महाराज मोरे म्हणाले की, स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या भूमिकेबद्दल वारकरी संप्रदायात नाराजी आहे. त्यात देहू येथे होणाऱ्या विराट हिंदू संमेलनात त्यांना आज बोलावले होते. यातून त्यांना शुद्धिपत्र देण्याचा प्रयत्न होत असल्याची संप्रदायात भावना निर्माण झाली. त्यामुळे गाथेला दुय्यम स्थान देणारी व्यक्ती बीज सोहळ्यात आली तर गोंधळ होऊ शकतो, अशी भूमिका बंडातात्या कराडकर आणि संयोजकांना सांगितली. त्यामुळे स्वामी गोविंददेवगिरी महाराज देहूत आले नव्हते.
संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार म्हणाले की, समर्थ रामदासांच्या विचारांचा प्रसार करणे स्वागतार्ह असले तरी त्यासाठी इतर संतांच्या वाङ्मयीन योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील संत परंपरा विविध विचारधारांचा संगम आहे. कोणत्याही एका प्रवाहाला उंचावण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणे ही परंपरेच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारी बाब आहे.
Web Summary : Swami Govinddev Giri faced opposition for remarks on Sant Tukaram's Gatha. Warakaris protested, preventing his attendance at Dehu's Virat Hindu Sammelan. His comments sparked controversy, leading to his withdrawal from the event.
Web Summary : स्वामी गोविंददेव गिरी को संत तुकाराम की गाथा पर टिप्पणी के कारण विरोध का सामना करना पड़ा। वारकरियों ने विरोध किया, जिससे देहू के विराट हिंदू सम्मेलन में उनकी उपस्थिति बाधित हुई। उनकी टिप्पणियों से विवाद हुआ, जिसके कारण उन्होंने कार्यक्रम से नाम वापस ले लिया।