सुपे येथे होत असलेल्या विविध विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. या वेळी ते बोलत होते.
या वेळी पवार म्हणाले की भविष्याची गरज ओळखून सुप्याचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील त्रुटी लवकरच काढल्या जातील. मात्र शेतकऱ्यांनी आपआपल्या जमिनी विकू नये, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. सुप्यात नव्याने होत असलेल्या पोलीस ठाण्याच्या जागेची पाहणी पवार यांनी केली. यादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देखमुख, विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सपोनी सोमनाथ लांडे यांच्याशी चर्चा केली. पोलीस ठाणे चौफुला-मोरगाव या रस्त्यावर होत असून, भविष्यात या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास होणाऱ्या इमारतीला धोका पोहोचू नये, अशा पद्धतीने इमारतीचे बांधकाम व्हावे, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी पवार यांनी सुपे येथील उपबाजार समितीला गावाच्या वतीने देण्यात आलेल्या २२ एकर जागेची पाहणी केली. तसेच या ठिकाणचे पडझड झालेले शासकीय विश्रामगृह नव्याने बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर गावात ४ कोटी खर्चाच्या निधीतून होणारे अंतर्गत रस्ते दर्जेदार करण्याच्या सूचना पवार यांनी केल्या. तर सुप्यात विद्या प्रतिष्ठान संचलित नव्याने होत असलेल्या कॉलेजच्या इमारतीची पहाणी करुन काही तृटी दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या. तसेच यावेळी अभयारण्यातील रखडलेल्या रस्त्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. काळे यांच्याशी चर्चा करुन यापूर्वी असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे असे पवार यांनी सांगितले. यावेळी वढाणे, नारोळी येथील नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती निता बारवकर, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे, जि. प. सदस्य भरत खैरे, सोमेश्वरचे संचालक गणेश चांदगुडे, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, माजी सभापती शौकत कोतवाल, संपतराव जगताप, पोपटराव पानसरे, ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, संजय दरेकर, प्रांताधिकारी दादासो कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
.................................. सुपे येथे नव्याने होत असलेल्या पोलिस ठाण्याच्या जागेचा आराखडा पहाताना पवार व अधिकारी वर्ग.