वरवंड : कानगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरीचे चांदीचे मुखवटे चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुशांत किणगे यांनी दिली. या घटनेमुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. सकाळी मंदिरात पूजा झाल्यानंतर पुजाऱ्याने मंदिर बंद करून दरवाजाला कुलूप लावले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी पांडुरंग साळुंके दिवाबत्ती करण्यासाठी मंदिरात आले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी मंदिरात प्रवेश घेतला.त्यांना भैरवनाथ आणि जोगेश्वरीचे चांदीचे मुखवटे, नागाची फणी, पादुका या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले.त्यानंतर पुजाऱ्यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितल्यानंतर गावात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गावात निषेधसभा घेण्यात आली. चोरट्यांचा तातडीने शोध लावून चोरट्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, देवाचे मुखवटे परत मिळाले पाहिजेत असा सूर ग्रामस्थांत होता. रात्री उशिरा घटनास्थळी गावात श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञ आले होते. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुशांत किणगे, रंजित निकम, रमाकांत गवळी, पोलीस पाटील बारवकर, अशोक खान यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)आज कानगाव बंदकानगाव येथील देवाचे चांदीचे मुखवटे चोरीला गेल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १) ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले आहे.
कानगावला मंदिरातून चांदीचे मुखवटे चोरीला
By admin | Updated: June 30, 2015 23:21 IST