पुणे : राज्यातील महत्त्वाचे हॉस्पिटल असलेल्या ससूनमधील पोलीस चौकी ४ दिवसांपासून बंद ठेवल्याने पंचनाम्याअभावी मृतदेहांना ताटकळत राहावे लागण्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने शुक्रवारी उजेडात आणले. त्यानंतर ग्रामीण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून, तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठवून चौकी पूर्ववत सुरू करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी दिले आहेत.हवेली पोलीस ठाण्याअंतर्गत ससून पोलीस चौकीचे काम चालते. पालखी बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठविण्यात आल्याने मनुष्यबळाअभावी पोलीस चौकीच बंद ठेवण्यात आली. ससूनमधील पोलीस चौकीमध्ये जिल्ह्यातील मृतदेहांचे पंचनामे करण्याचे काम केले जाते. चौकीच कुलूप लावून बंद केल्याने हे कामच ठप्प झाले. त्यामुळे शवागारात मृतदेह ठेवून जिल्ह्याच्या ठिकाणांहून ठाण्यातून पोलीस येण्याची दोन-दोन दिवस वाट पाहण्याचा अत्यंत वाईट वेळ नातेवाइकांवर आली आहे. आप्तस्वकीयांना गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून पोलिसांच्या अनागोंदी कारभाराचा मारा नातेवाइकांना निमूटपणे सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. पोलीस अधीक्षक जय जाधव यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर पाठविणे योग्य नाही. पोलीस चौकी बंद ठेवण्याचा प्रकार चुकीचाच आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना तातडीने पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ससून हे राज्यातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये बायपाससह अनेक मोठ्या शस्त्रक्रिया, दुर्धर आजारांवर उपचार केले जात असल्याने संपूर्ण राज्यभरातून रुग्ण ससूनमध्ये येत असतात. खून, अपघात, आत्महत्या व इतर संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मृतदेहांचा पंचनामा तसेच शवविच्छेदन करूनच ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले जातात. पुणे शहराच्या हद्दीतील घटना असेल, तर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी लगेच येऊन मृतदेहाचा पंचनामा करतात. जिल्ह्यातील मृतदेहांचा पंचनामा करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ससूनमधील पोलीस चौकी त्वरित सुरू करा
By admin | Updated: July 11, 2015 05:10 IST