जेजुरी : सासवड जेजुरी महामार्गावर जेजूरी नजीक भिवंडी- गाणगापूरकडे जाणारी एस.टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ३४ जण जखमी झाले. हा अपघात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झाला. यातील २३ गंभीर जखमींना पुणे येथे हलवण्यात आले असून ४ जखमीवर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ७ जखमीवर प्रथमोपचार करून सोडण्यात आले आहे. अपघातांनंतर काही किरकोळ जखमी प्रवाशी तेथूनच निघून गेले.या अपघाताबद्दल मिळालेली माहिती अशी की, आज ठाणे आगारातील बस ४० ते ५० प्रवाशांसह भिवंडीहून गाणगापूर कडे जात होती, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सासवड जेजुरी महामार्गावरील वीज उपकेंद्राच्या पुढील बाजूस हनुमाननगर येथील भरावावरून दोन पलटी घेत रस्त्याच्या बाजूस उतारावर उलटली़ अपघात येवढा गंभीर होता की यातील प्रवाशांचे दैव बलवत्तर की काय कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण समजू शकले नाही. मात्र जखमी प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ही बस भरधाव वेगाने जात असताना अचानक आवाज आला आणि क्षणात ही घटना घडली. जखमींच्या मदतीसाठी स्थानिकांनी मदत केली. सर्व जखमी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता या ठिकाणी केवळ एक सहाय्यक अधीक्षक श्रीकृष्ण खरमाटे व ४ कर्मचारी उपलब्ध होते. इतर सर्व वैद्यकीय अधिकारी मुख्यमंत्र्यासोबत दौऱ्यात सहभागी झालेले असल्याने जखमीवर उपचार करणे मोठे जिकिरीचे बनले होते. जखमींची संख्या अधिक असल्याने स्थानिक वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स नितिन केंजळे, डॉ. कैलास सुपेकर, डॉ. बाळकृष्ण कुदळे, डॉ. सतीश कारकर, संजय गळवे, डॉ.विश्वास नाझिरकर आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींना उपचार केले. घटनास्थळी भेट देवून उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, तहसीलदार संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके तसेच एस.टी. महामंडळाचे सासवड आगार प्रमुख एस. एस. सुर्वे, स्थानकप्रमुख पी. आऱ भोसले, एस. एस. जोशी यांनी ग्रामीण रुग्णालयात येवून जखमींची विचारपूस केली. एस.टी. महामंडळाकडून किरकोळ जखमींना जागेवरच उपचारासाठी ५०० रुपयांची मदत केली. (वार्ताहर)
जेजुरीत एसटीला अपघात; ३४ प्रवासी जखमी
By admin | Updated: June 12, 2015 06:00 IST