तळेगाव ढमढेरे - विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.विठ्ठलवाडी येथील मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करणाºया दाम्पत्याने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी जिवाचे रान केले. मुलीनेही परिस्थितीशी झगडत घरामध्ये विजेची सुविधा नसतानादेखील दिव्याच्या उजेडावर व शेजाºयांच्या घरात अभ्यास करून परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवीत एक आदर्श निर्माण केला आहे. विठ्ठल काशीकर व मनीषा काशीकर यांनी मोलमजुरी करुन मुलीला शिक्षणासाठी साथ दिली, परिस्थितीशी सामना करून घरामध्ये विजेची सुविधा नसतानादेखील आईवडिलांच्या कामामध्ये मदत करून घरातल्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करत यश मिळवले. शाळा स्थापनेपासून आजपर्यंत कधीही दहावीमध्ये कुणालाही न पडलेले असे ९३.२० टक्के गुण मिळवीत विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने सुषमाचा सरपंच अलका राऊत यांच्या हस्ते सत्कार केला. या वेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गवारे, शरद लोखंडे, ज्ञानेश्वर राऊत, दत्तात्रय गवारे, जगन्नाथ गवारे, भिवाजी दोरगे, मधुकर दोरगे, नंदकुमार चौधरी, सागर राऊत, रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढेदेखील तिला शिक्षण घेण्याची इच्छा असून आम्हाला मुलीने मिळविलेल्या यशाचा अभिमान असून, यापुढील काळात परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघड होणार असल्याने जर ग्रामस्थांनी शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला तरच सुषमाचे शिक्षण पूर्ण होईल.- मनीषा काशीकर, आई
परिस्थितीवर मात करत मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:22 IST