ऑनलाइन लोकमच
पुणे, दि. ५ - दुकानाचे शटर उचकटत सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरट्यांनी बिबवेवाडीमधील सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानातील सायरन वाजल्यामुळे चोरटे चोरीचा प्रयत्न सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे महेश सोसायटी चौकामध्ये घडली. बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे.
याप्रकरणी शशिकांत राजाराम खांडरे (वय 41, रा. शांताई बंगला, ग्रीन एकर सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. खांडरे यांचे महेश सोसायटीमध्ये श्रीयस ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. खंडारे यांनी शुक्रवारी दिवसभरातील व्यवहार संपल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर ते दुकानाचे आतील व बाहेरील जाळीचे गेट बंद करुन घरी निघून गेले. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांना दुकानासमोरील इमारतीमध्ये राहणा-या ओळखीच्या व्यक्तीने फोन करुन दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसत असल्याची माहिती कळवली.
त्यानुसार, खांडरे यांनी दुकानावर धाव घेतली. तेव्हा दुकानाच्या जाळीचे शटर कटरच्या सहाय्याने तोडलेले होते. तसेच आतील मुख्य गेटच्या पट्ट्या कटावणीच्या सहाय्याने उचकटून अर्धवट उघडलेल्या अवस्थेत होते. चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडलेला होता. त्याच्या आतील व बाहेरच्या बाजुच्या वायर्स व इलेक्ट्रीक बोर्ड तोडून टाकलेला होता. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष बर्गे, सहायक निरीक्षक राजन जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चोरीचा प्रयत्न करीत असताना दुकानामध्ये बसवलेला सायरन वाजला. बराच वेळ सायरन वाजत असल्यामुळे घाबरलेले चोरटे चोरीचा प्रयत्न सोडून तेथून निसटले. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये चोरट्यांची छबी कैद झाली असल्यास तपासाला मोठी मदत मिळणार आहे. खांडरे यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बसवलेल्या सायरनमुळे त्यांचा लाखोंचा ऐवज चोरीला जाण्यापासून बचावला.
चोरीचा प्रयत्न झालेले सराफी दुकान अगदी चौकामध्ये आहे. बिबवेवाडीच्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर असलेल्या महेश सोसायटी चौकामध्येच असलेले हे दुकान भल्या पहाटे फोडले गेल्यामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची धास्ती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपुर्वी या भागात एक सराईत घरफोड्या संशयास्पद अवस्थेत फिरताना नागरिकांना आढळून आला होता. त्याच्या हालचालींबाबत काही नागरिकांनी पोलिसांना माहितीही पुरवली होती. त्याच्या दुचाकीचा क्रमांकही पोलिसांना देण्यात आला होता. आगाऊ माहिती मिळूनही पोलिसांनी त्याकडे गांभिर्याने न पाहिल्याने ही घटना घडली आहे.
मी नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेलो. शनिवारी सकाळी मला दुकानासमोर राहणा-या एका ओळखीच्या व्यक्तीने फोन करुन दुकानाचे शटर कोणीतरी उचकटल्याचे सांगितले. त्यानुसार मी दुकानावर धाव घेतली. दुकानातील सायरन वाजल्यामुळे चोरी न करता चोरटे घाबरुन पळाले. माझा ऐवज वाचला असला तरी चोरट्यांनी भर चौकातील दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यापा-यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे.
- शशिकांत खांडरे, दुकान मालक