प्रज्ञा केळकर-सिंग,पुणेपुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. लेखन, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण अशा सर्व जबाबदाऱ्यांची धुरा सांभाळत त्या ‘वन वूमन शो’तून स्वत:ला सिद्ध करीत आहेत. विविध प्रयोगांच्या निमित्ताने त्यांना परगावी, परराज्यांत, परदेशांतही जाण्याची संधी मिळते. अशा वेळी धाडस, आत्मविश्वास, क्षमता, कौशल्य आणि दर्जा यांच्या सोबतीने त्या स्वत:चा ठसा उमटवतात. संघर्षाकडे, आव्हानांकडे संधी म्हणून पाहत कलाकारांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत उदयोन्मुख कलाकारांसाठी आदर्श निर्माण करून दिला आहे. साठच्या दशकात मराठी नाटकांमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. एकपात्री नाटकाचा जन्म याच काळातला. महिला कलाकारांना एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने नानाविध अनुभव येतात. मानधन, आयोजक, प्रेक्षक, प्रवास, सुरक्षितता या सर्वच निकषांवर त्यांचा कस लागतो. एकपात्री कला परिषदेच्या अध्यक्षा चैत्राली माजगावकर म्हणाल्या, ‘‘सध्या या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे खंबीरपणा, बिनधास्तपणा, धाडस आणि कलेवर प्रेम असणारी महिलाच यात पाय रोवून उभी राहू शकते. चार-पाच विनोद, कविता, शायरी एकत्र करून त्यांचे सादरीकरण केले म्हणजे एकपात्री सादर केले, असे होऊ शकत नाही. त्यासाठी साहित्याचा अभ्यास, लेखनाचे कौशल्य, सकस संहिता निर्माण करण्याची क्षमता असावी लागते. तरच, एकपात्रीच्या क्षेत्रात टिकाव लागू शकतो. एकपात्री प्रयोगांसाठी बाहेरगावी गेल्यावर जेवण, स्वच्छतागृह, कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली अशा गोष्टींसाठीही बऱ्याचदा झगडावे लागते.’’‘चर्पट मंजिरी’ फेम मंजिरी धामणकर यांनी ‘समाधानकारक धन मिळाले नाही तरी मान मात्र मिळतो,’ असे सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना एका महिलेचा कार्यक्रम पचनी पडत नाही, अशा वेळी प्रसंगावधान राखावे लागते, असे त्यांनी सांगितले.‘हास्यवर्षा’, ‘क कवितेचा’ हे कार्यक्रम करणाऱ्या डॉ. मृण्मयी भजक म्हणाल्या, ‘‘महिलांना विनोदातलं काय कळतं? हा समज लोकांच्या मनात अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग पाहून त्याप्रमाणे अचानक कार्यक्रमात बदल करावे लागतात आणि त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो.’’ ‘अस्सा नवरा’, ‘एक दिवस असाही’ फेम कल्पना देशपांडे म्हणाल्या, ‘‘बऱ्याचदा कपडे बदलण्यासाठी देण्यात येणाऱ्या खोलीला काचा नसतात. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असते. अशा वेळी संकोच न करता आयोजकांकडे पर्यायी व्यवस्था मागावी लागते’’ ‘ओंजळीतील फुले’, ‘जरा विसावू कवितेपाशी’ असे कवितांचे कार्यक्रम करणाऱ्या शांभवी बोधे म्हणाल्या, ‘‘कविता म्हटली, नाकं मुरडली जातात. कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसादही समाधानकारक नसतो. पण, एकदा लोकांना कार्यक्रमाचा दर्जा, वेगळेपण कळलं, की फारशी अडचण येत नाहीत.’’
एकपात्री नारी, घेईल भरारी!
By admin | Updated: September 24, 2015 03:06 IST