लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रोहित शिंदे अकादमीतर्फे आयोजित पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात श्रेया सागडे, इशिता जाधव आणि रमा शहापूरकर यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
कर्वेनगरच्या स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुलात शुक्रवारी (दि. १९) सुरू झालेल्या या स्पर्धेत महिला गटात दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित श्रेया सागडेने पाचव्या मानांकित वैदेही काटकरचा ६-० असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. इशिता जाधवने तिसऱ्या मानांकित संचिता नगरकरचा ६-० असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. रमा शहापूरकरने दुसऱ्या मानांकित वाय. देसाईचा ६-१ असा पराभव करून आगेकूच केली.
अव्वल मानांकित दिविजा गोडसे हिने तेजल शोत्रीचा ६-० असा, तर सहाव्या मानांकित समीक्षा श्रॉफ हिने ऋता सचदेववर ६-१ असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित श्रुती नांजकर हिने तन्वी तावडेचे आव्हान ६-२ असे संपुष्टात आणले. आठव्या मानांकित निहारिका गोरेने योगांजली सारुकला ६-२ असे नमविले. नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. अमोल वरखडे, प्रणव टेकाळे, आशिष दिवेकर, डॉ. राजेंद्र खेडेकर, निखिल शिंदे, आदित्य टक्के, स्पर्धा संचालक रोहित शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुसरी फेरी : महिला गट :
दिविजा गोडसे (१) वि.वि.तेजल शोत्रीया ६-०;
श्रेया सागडे वि.वि.वैदेही काटकर (५) ६-०;
इशिता जाधव वि.वि.संचिता नगरकर (३) ६-०;
समिक्षा श्रॉफ (६) वि.वि.ऋता सचदेव ६-१;
श्रुती नांजकर(४) वि.वि.तन्वी तावडे ६-२;
निहारिका गोरे (८) वि.वि.योगांजली सारुक ६-२;
रमा शहापूरकर वि.वि.वाय देसाई (२) ६-१.