पुणे - महाभारत, रामायणाचे संस्कार करूनच शिवरायांसारखा शिवसूर्य जन्माला येतो. आज शिवचरित्राची जितकी आवश्यकता आहे, तितकी आवश्यकता यापूर्वी कधीच नव्हती. शिवरायांना समजून घेण्यासाठी आधी जिजाऊंसारख्या मातेला समजून घ्यायला हवे. आपल्यामधील शिवज्योत आपण विझवत आहोत. प्रत्येकाने ज्योतीने ज्योत पेटवायला हवी. शिवरायांचा लढा हा जिहादी आतंकवाद्यांविरुद्ध आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होता. शिवरायांचे चरित्र हे सर्व प्रश्न सोडवणारे असून ते समजून घेण्याची सर्वाधिक गरज आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्यात्या गीता उपासनी यांनी केले.लाल महाल येथे समस्त हिंदू आघाडी, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, लाल महाल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त मातृगौरव पुरस्कार प्रदान केले, त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रा. संगीता मावळे, प्रीती शिंदे, चारुलता काळे, सारिका वारुळे, दीपाली गिते, उषा फडतरे, दीपाली झेंडे, अॅड. मोहन डोंगरे, शाहीर हेमंतराजे मावळे, नंदू एकबोटे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बबई फडतरे, शकुंतला देशमाने, विजया कुलकर्णी, गीता हेंद्रे, चंद्रभागा काळे या मातांना मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गीता उपासनी म्हणाल्या, ‘‘देवाधर्माची होणारी विंटबना ही महाराजांना पटणारी नव्हती. अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. तीर्थक्षेत्रे मुक्त व्हावीत, हे त्यांचे ध्येय शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि त्यासाठी ते लढत राहिले. जिथे हिंदू धर्म एकवटतो, ती तीर्थक्षेत्र आहेत. हिंदूधर्माचे हे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची आज गरज आहे.’’
शिवचरित्राची आजच्या काळात सर्वाधिक गरज - गीता उपासनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:56 IST