भोर : शिवसेना प्रणीत कामगार सेनेच्या काही कर्मचा-यांनी पोलीस बंदोबस्तात एसटी गाड्या डेपोबाहेर काढून वाहतूक सुरू केली. यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपात फूट पडली आहे. जिल्ह्यात सर्वांत प्रथम प्रवासी वाहतूक भोर आगाराने सुरू केली आहे.सेनेच्या कर्मचा-यांना विश्वासात न घेताच काही जणांनी संप मोडल्याने सेनेच्या एसटी कामगार संघटनेच्या कर्मचा-यांनी शिवबंधन तोडून एसटी कामगार कृती समितीत प्रवेश केला आहे. यामुळे भोर एसटी डेपोत दिवसभर घडामोडींना वेग आला होता.दिवाळीत एसटी संघटनेच्या कृती समितीने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप केल्यामुळे १६ आॅक्टोबरपासून एकही एसटी सुरू नसल्याने सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांचे, १ हजार पासधारक नोकरीवाल्याचे आणि हजारो प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. मात्र, गुरुवारी सकाळी १० वाजता शिवसेनाप्रणीत एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामदास खुटवड, सचिव विशाल निगडे, अशोक काकडे, राजाभाऊ आढाव, विशाल इंगळे, नवनाथ देशमुख, तुकाराम दामगुडे, रियाज तांबोळी, नितीन मोहिते, पोपट बांदल या ८ वाहक व ८ चालकांनी एसटी बस डेपोबाहेर काढून १०.१५ वाजता प्रवाशांच्या हस्ते नारळ फोडून कोर्ले, मळे, वरवडी चिखलगाव, दुर्गाडी, महुडे, कारी, आंबाडे या गावांना पोलीस बंदोबस्तात एसटी बस ननेल्या. मात्र, संप असल्याने फारसे प्रवासी नव्हते. कर्मचा-यांनी एसटी गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आणि मागील तीन दिवसांत प्रवशांचे हाल झाल्याबद्दल आगारप्रमुख स्वाती आवळे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिवसेना कामगार संघटनेत फूट, भोरला बंदोबस्तात एसटी सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 20:16 IST